कवी ललित अधाने यांना दीनमित्रकार सत्यशोधक मुकुंदराव पाटील साहित्य पुरस्कार जाहीर

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.७ 

छत्रपती संभाजी नगर | येथील सुप्रसिद्ध कवी डॉ. ललित अधाने यांच्या “माही गोधडी छप्पन भोकी” या कविता संग्रहास दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीच्या वतीने दिला जाणारा व अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा “दीनमित्रकार सत्यशोधक मुकुंदराव पाटील साहित्य पुरस्कार” नुकताच घोषित करण्यात आला. अशी माहिती स्मारक समितीचे सचिव उत्तमराव पाटील यांनी दिली. सन २०२२-२३ पुरस्कारासाठी कवी ललित अधाने यांच्या सध्या सर्वत्र गाजत असलेल्या ” माही गोधडी छप्पन भोकी ” या काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली. सदरील पुरस्कार दैनिक लोकमतचे मुख्य संपादक मा राजेंद्रजी दर्डा यांच्या शुभहस्ते रविवार २४ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी दहा वाजता तरवडी तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथे मोठ्या समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.

कवी ललित अधाने हे १९९० नंतरच्या पिढीतील एक महत्त्वाचे कवी असून मराठवाड्यातील साहित्य चळवळीशी त्यांचा निकटचा संबंध राहिलेला आहे. गाव खेडे शेतीमाती हा  त्यांच्या चिंतनाचा विषय असून अधाने यांनी शेतकरी समूहाची वेदना धारदार शब्दात या कवितेतून मांडली आहे. ज्योतीराव फुलेंपासून शेतकऱ्याचे प्रश्न साहित्यात प्रकर्षाने मांडण्याची परंपरा अधाने यांचा हा संग्रह चालविताना दिसतो. वर्तमानात शेतकरी हा वर्ग रसातळाला गेला आहे. दलितांपेक्षा दलित अशी त्याची अवस्था आहे. शेती हीच जात, शेती हाच धर्म मानणाऱ्या या समूहाचा आकार जेवढा मोठा आहे, तेवढाच मोठा आकार त्याच्या भोवती विळखा घातलेल्या समस्यांचाही आहे याचं क्रांतिकारी चित्र त्यांच्या कवितांमध्ये उमटलेले आहे.सह्याद्री प्रतिष्ठान व उन्मानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी विविध साहित्यिक उपक्रमांचे आयोजन केले. त्यांचा यापूर्वी “कुणबी बाप” हा काव्यसंग्रह प्रचंड गाजला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांच्या अभ्यासक्रमातही त्यांच्या कवितेचा समावेश झालेला आहे. त्यांच्या या काव्यसंग्रहास कुसुमाग्रज काव्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण काव्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.तसेच त्यांचा ‘नाट्यानुबंध’ हा समीक्षा ग्रंथ प्रकाशित असून त्यांनी ‘वाडमयीन प्रवृत्ती तत्त्वशोध’ या डॉ. दादा गोरे यांच्या गौरवग्रंथाचेही संपादन केले.

हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विनायकराव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव थोरे , विजय आहेर डॉ. एस.डी परदेशी, डॉ. बळीराम धापसे, डॉ. महेश खरात, डॉ .चंद्रकांत शिरसाट, डॉ. भीमराव जाधव, डॉ. अशोक गोडसे डॉ. शेषराव राठोड, डॉ . सुनील डहाळे, डॉ. ज्ञानेश्वर खिल्लारी प्रा. संतोष तुपे, प्रशांत अधाने, ज्ञानेश्वर अधाने, डॉ मारुती गायकवाड, डॉ. गणेश राठोड आदींनी अभिनंदन केले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!