मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर उद्या बैठक ; मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठानतर्फे उपस्थित राहण्याचे आवाहन
मराठवाड्यात २६० टीएमसी पाण्याची आवश्यकता

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.१
छत्रपती संभाजीनगर | मराठवाड्यात पाणी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून जायकवाडीच्या समन्यायी पाणीवाटपाचे सूत्र बदलल्यामुळे मराठवाड्यात असंतोष निर्माण झाला आहे. मराठवाड्यातील पाणी प्रश्नाच्या संदर्भात रविवारी (दि.२) चर्चा करण्यात येणार आहे. यासाठी मराठवाड्यातील सर्व आमदारांना या बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे. मसिआ सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाची गंभीरता लक्षात घेऊन या बैठकीला हजर राहावे, असे आवाहन मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठानतर्फे आयोजित पत्रकार परिषदेतून केले.
जयसिंग हिरे, मसिआचे अध्यक्ष चेतन राऊत, अनिल पाटील यांनी पाण्याच्या समस्या मांडल्या. मराठवाड्यात २६० टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे १५५ टीएमसी पाणी वळवणे, कृष्णा खोऱ्यातून लातूर, धाराशिव, बीडसाठी ५१ टीएमसी पाणी उपलब्ध करणे, विदर्भातून परभणी, हिंगोली, नांदेडसाठी पाणी आणणे गरजेचे आहे, असे मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंकरराव नागरे यांनी सांगितले. पैठण च्या नाथसागरात मुबलक पाणी साठा उपलब्ध असला तरी उन्हाळा सुरु झाला कि मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण होते. या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास प्रत्येकाला पाणी समस्येला सामोरे जावे लागणार नाही. लोकप्रतिनिधी याकडे नेहमीच दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळते. मात्र याबाबत गांभीर्य लक्षात घेऊन सर्व लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहण्यासाठी मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठानतर्फे प्रयत्न केले जात आहे.