बीडची ओळख खेळाडूंचा जिल्हा म्हणून व्हावी ; अमरसिंह पंडित ; दिमाखदार सोहळ्यात क्रीडा महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. ६   

बीड | ऊसतोड कामगारांचा जिल्हा ही ओळख पुसून आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून बीडची ओळख खेळाडूंचा जिल्हा म्हणून व्हावी, खेळाच्या माध्यमातून नोकरी व्यवसायासह खेळामध्ये सुध्दा करीअर करण्याच्या संधी उपलब्ध आहेत. भविष्यात या क्रीडा महोत्सवाचे स्वरुप वाढविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन अमरसिंह पंडित यांनी केले. दिमाखदार सोहळ्यात क्रीडा महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. मान्यवरांसह खेळाडू, पालक, प्रशिक्षक व इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्कृष्ट आयोजनासाठी उपस्थितांनी रणवीर पंडित यांचे कौतुक केले.

जय भवानी व जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या क्रीडा महोत्सव २०२२ चा पारितोषिक वितरण समारंभ दिमाखदार सोहळ्यात शुक्रवार, दि.६ जानेवारी रोजी जय भवानी शैक्षणिक संकुल, शिवाजीनगर येथे संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर हॉकी प्रशिक्षक प्रा.डॉ.सचिन देशमुख, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू वैभव गर्जे, महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक प्रा.ब्रम्हनाथ मेंगडे, राष्ट्रीय खेळाडू गोपाल मोटे, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू व प्रशिक्षक प्रा.डॉ.राणी पवार, क्रीडा महोत्सवाचे आयोजक रणवीर पंडित यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना रणवीर पंडित म्हणाले की, गेवराई तालुक्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले, दरवर्षी असे क्रीडा महोत्सव आयोजित करून विद्यार्थ्यांच्या क्रीडा वाटचालीसाठी पोषक वातावरण निर्माण केले जाईल. यावर्षी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. महोत्सवात आयोजित केलेल्या खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल आणि ॲथलेटीक्स स्पर्धेमध्ये जय भवानी आणि जगदंबा शिक्षण संस्थेच्या विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. यातूनच चांगले विद्यार्थी खेळाडू म्हणून पुढे येतील आणि गेवराई तालुक्याचे नाव क्रीडा क्षेत्रात झळकवतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

क्रीडा महोत्सवात खो-खो, व्हॉलीबॉल आणि कबड्डी स्पर्धांमधील विजेत्या संघांचा यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आला. खो-खो स्पर्धेमध्ये मुलीच्या वरिष्ठ गटात जय भवानी विद्यालयाने विजेतेपद पटकावले तर माध्यमिक विद्यालय, पाचेगावच्या संघाला उपविजेता पारितोषिक मिळाले. उत्कृष्ट खेळाडू म्हणून कु.आश्विनी येवले हिचा सत्कार करण्यात आला. मुलाच्या वरिष्ठ गटात जयभवानी विद्यालयाने विजेता क्रमांक मिळवला तर शारदा विद्यामंदिर, गेवराईच्या संघाला उपविजेता घोषित करून पारितोषिक प्रदान करण्यात आले. मुलाच्या कनिष्ठ गटात शारदा विद्यामंदिरच्या संघाचा विजेता तर उपविजेता ठरलेल्या जयभवानी विद्यालय, शिवाजीनगरच्या संघाला पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट खेळाडू म्हणून ऋतिक कऱ्हे याचा सत्कार करण्यात आला. व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलीच्या गटात माध्यमिक विद्यालय, तलवाडाच्या संघाला विजेता पारितोषिक देऊन गौरविण्यात आले तर शारदा विद्यामंदिरच्या संघाला उपविजेता पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट खेळाडू म्हणून कु.ज्ञानेश्वरी मोरे हिचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलाच्या वरिष्ठ गटात शिवशारदा पब्लिक स्कुलच्या संघाने प्रथम पारितोषिक सन्मान करण्यात आला तर उपविजेत्या ठरलेल्या माध्यमिक विद्यालय मारफळाच्या संघाला सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट खेळाडू म्हणून कृष्णा तिवारी याचा सत्कार करण्यात आला. कबड्डी स्पर्धेत मुलीच्या गटामध्ये यमादेवी विद्यालय जातेगावच्या संघाला विजेता तर माध्यमिक विद्यालय, रामपुरीच्या संघाला उपविजेता चषक देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट खेळाडू म्हणून कु.प्रतिक्षा राठोड हिचा सत्कार करण्यात आला. कबड्डी स्पर्धेमध्ये मुलाच्या वरिष्ठ गटात शारदा विद्यामंदिर गेवराईच्या संघाला विजेता तर यमादेवी विद्यालयाच्या जातेगावच्या संघाला उपविजेता पारितोषिक देवून सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट खेळाडू म्हणून सुजल खरात याचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. कबड्डी स्पर्धेमध्ये मुलांच्या कनिष्ठ गटात शारदा विद्यामंदिर, गेवराईच्या संघाला विजेता तर माध्यमिक विद्यालय तलवाडाच्या संघाला उपविजेता चषक देऊन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट खेळाडू म्हणून अमर घाडगे याचा वैयक्तिक पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. ॲथलेटीक्स स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून अभिषेक गात तर विजेता संघ म्हणून शिवशारदा पब्लिक स्कुलचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. ॲथलेटीक्स स्पर्धेत मुलीच्या गटात उत्कृष्ट खेळाडू म्हणून कु.दिव्या पवार हिचा तर विजेत्या ठरलेल्या जयभवानी विद्यालयाच्या संघांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन माधव चाटे यांनी करून उपस्थितांचे आभार मानले या कार्यक्रमाला जय भवानी आणि जगदंबा शिक्षण संस्थेच्या सर्व विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, खेळाडू, क्रीडाप्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!