डॉ आंबेडकर जयंती महासमितीच्या वतीने मिरवणूक मार्गाची पाहणी ; अध्यक्ष राजू शिंदे कार्याध्यक्ष मिलिंद दाभाडे यांनी केल्या प्रशासनाला सूचना

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. १०
छत्रपती संभाजी नगर | भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांची १३२ वी जयंती यंदा समाजाभिमुख विविध उपक्रमांनी येत्या १४ एप्रिल रोजी साजरी होत असून यानिमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महासमितीच्या वतीने आज क्रांती चौक ते पैठण गेट या मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यात आली. यावेळी उत्सव महासमितीचे अध्यक्ष राजू शिंदे, कार्याध्यक्ष मिलिंद दाभाडे, समन्वयक गौतम खरात, गौतम लांडगे यांनी मिरवणूक मार्गात असलेले अडथळे, अतिक्रमण तसेच रस्त्यावर लोंब काळणाऱ्या विद्युत व इतर तारा तातडीने काढण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला केल्या.
मिरवणूक मार्गाची पाहणी करतांना छत्रपती संभाजी नगर जिल्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महासमितीचे बंडू कांबळे, जालिंदर शेंडगे, विजय मगरे यांची उपस्थिती होती. यावेळी क्रांती चौक पोलीस प्रशासनातील डीसीपी अशोक थोरात, एसीपी अशोक थोरात तसेच पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांची उपस्थिती होती. १३ एप्रिल अगोदर क्रांती चौक ते भडकल गेट या मिरवणूक मार्गात असलेले विविध अतिक्रमण स्टेज उभारणीसाठी बाधक ठरत असल्याचे निदर्शनास येत असल्याने ते तातडीने काढण्यासाठी संबंधित विभागांना पुढील कार्यवाही करण्यासाठी आदेशित करावे अशी सूचना पोलीस प्रशासनाला महासमितीच्या वतीने करण्यात आल्या. तसेच मिरवणूक मार्गातील खड्डे पडलेल्या रस्त्यांची डागडुजी, आवश्यक विद्युत रोषणाई तसेच विविध मंदिरे, मस्जिद या ठिकाणी पडदे लावावेत अशाही सूचना यावेळी संबंधित प्रशासनाला करण्यात आल्या.
महासमितीच्या वतीने १४ एप्रिल दरम्यान विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून छत्रपती संभाजी नगरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या छत्रपती संभाजी नगर शहरातील भीमजयंतीचा जन्मोत्सव सोहळा यावर्षी अविस्मरणीय ठरणार आहे. हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात क्रांती चौक ते भडकल गेट दरम्यान साजरा करण्यात येणार असल्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महासमिती चे अध्यक्ष राजू शिंदे कार्याध्यक्ष मिलिंद दाभाडे यांनी स्पष्ट केले.