विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या विरुद्ध विलास भुमरे यांचा अब्रू नुकसानीचा दावा ; कायदेशीर नोटीस बजावून वकीलामार्फत मागविला खुलासा

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.४
छत्रपती संभाजी नगर | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रिंट तसेच इलेक्ट्रोनिक माध्यमांसमोर पत्रकार परिषदेत दिनांक १९ नोव्हेंबर रोजी बेताल वक्तव्य केले होते. यासंदर्भात १९ नोव्हेंबर रोजी ईल्क्ट्रोनिक व २० नोव्हेंबर रोजी दैनिक दिव्य मराठी मध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. याबात खुलासा मागवत पैठण मतदार संघाचे नवनिर्वाचीत आमदार विलास संदीपान भुमरे यांनी मानहानीचा दावा केला असून वकिलामार्फत दहा दिवसांच्या आत १० कोटी रुपये अब्रू नुकसान तसेच जाहीर माफीनामा बाबत नोटीस बजावली आहे.
विधान सभा निवडणुक प्रचाराच्या कार्यकाळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सायंकाळी पैठण विधानसभा मतदार संघातील पिंपळवाडी पिराची येथील जाहीर सभेत विलास भुमरे यांच्याबद्दल अवमानकारक आणि बेताल वक्तव्य केले होते. परिणामी विविध दैनिकांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्याने विलास भुमरे यांना अवमानकारक तसेच जनमानसात प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाला. यामुळे आमदार विलास भुमरे यांचे मताधिक्य कमी झाले असून अशा आशयाच्या बातम्यांमुळे बदनामी तसेच अवमानकारक परिस्थिती जनमानसात निर्माण करण्यास विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे कारणीभुत ठरले आहेत. याविरोधात नवनिर्वाचित आमदार विलास संदीपान भुमरे यांनी विधीज्ञ दिलीप अंबादास खेडकर यांच्या मार्फत दहा दिवसांच्या आत १० कोटी रुपये अब्रू नुकसान तसेच जाहीर माफीनामा बाबत नोटीस बजावली आहे. याबाबत दहा दिवसांच्या आत सदरील नुकसान भरपाई न दिल्यास न्यायालयात फौजदारी तसेच दिवाणी स्वरूपाचे खटले दाखल करण्यात येणार असल्याचे सदरील नोटीस द्वारे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना वकीलामार्फत कळविण्यात आले आहे.