फुलंब्री बाजार समितीच्या परिसरात आज मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा ; संपूर्ण राज्याचे लक्ष

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.९
फुलंब्री | शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात सोमवारी (दि.९) दुपारी तीन वाजता मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होत असून या सभेला सकल मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे. राज्यभरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने या जाहीर सभेसाठी शहरात दाखल झाले आहेत. जरांगे यांची मंगळवारीही छत्रपती संभाजी नगर शहरात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आल्याने संपूर्ण राज्याचे याकडे लक्ष लागले आहे.
या सभेसाठी बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रवेशद्वारावर व्यासपीठ व्यासपीठ उभारण्यात आले आहे. तसेच दोन जेसीबीच्या साह्याने फुलांची उधळण करून श्री जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात येणार आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बाजार समितीच्या परिसरात करण्यात आली. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने सभेला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे. फुलंब्री शहरासह तालुक्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी सकल मराठा समाज बांधवांनी हजर राहावे, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तालुका भर दोन रिक्षाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. मागील गेल्या दोन दिवसापासून ही रिक्षा गावोगाव फिरून सभेला येण्यासाठी आवाहन करीत आहे. या सभेसाठी सुमारे १०० स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात या सभेला गर्दी होणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने समन्वयकांनी दिली.