स्वाभिमान दहीहंडीचा कॅनॉट मध्ये रंगणार यंदा दिमाखदार सोहळा ; एकूण १ लाख ११ हजार १११ रुपये बक्षीस ; स्वाभिमान क्रीडा मंडळाचे आयोजन

दहीहंडी महोत्सव सोहळ्याची उत्सुकता शिगेला ; गोविंदा पथकाने सहभागी होण्याचे अध्यक्ष समीर लोखंडे यांचे आवाहन
लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.६
छत्रपती संभाजी नगर | सूर वाद्याच्या तालावर गोविंदा पथकाचे उत्कंठा वाढविणारे एकावर एक थर… पाहणाऱ्या प्रत्येकाचे डोळे दीपावणारे प्रत्येक क्षण… आणि उंचावर असलेल्या दहीहंडीला स्वाभिमानी मानाची सलामी यंदा दिमाखदार सोहळ्यात कॅनॉट प्लेस येथे गुरुवारी (दि.७) स्वाभिमान क्रीडा मंडळाच्या वतीने देण्यात येणार असून या सोहळ्याची गोविंदा पथकात असलेली उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी स्वाभिमान क्रीडा मंडळाच्या वतीने सिडको कॅनॉट प्लेस येथे स्वाभिमान दहीहंडी मोहत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद राठोड व नवनिर्वाचित अध्यक्ष समीर लोखंडे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देतांना नवनिर्वाचित अध्यक्ष समीर लोखंडे म्हणाले की, सामाजिक बांधिलकी जपत आणि पर्यावरणाचा समतोल राखत यावर्षी दहीहंडी महोत्सव साजरा करण्यात येत असून शहरातील सर्वप्रथम मनाची दहीहंडी गोविंदा पथकाच्या सहभागाने सलामी देऊन फोडण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजता या महोत्सवाला प्रारंभ होणार असून गोविंदा पथक दरवर्षी या दहीहंडीला सर्वप्रथम सहभागी होतात व नंतर इतर ठिकाणी जात असतात. मागील वर्षी ४० हून अधिक गोविंदा पथकाने या स्वाभिमान दहीहंडी महोत्सवात आपला सहभाग नोंदविला होता. यंदा गोविंदा पथकाचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक तथा स्वाभिमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद राठोड नवनिर्वाचित अध्यक्ष समीर लोखंडे यांनी दिली.
स्वाभिमान दहीहंडी महोत्सव गेल्या बारा वर्षांपासून सातत्याने यशस्वीरीत्या आयोजित करण्यात येत असून यंदाही हा महोत्सव दिमाखदार होणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी बोलताना व्यक्त केला. दहीहंडी महोत्सवादारम्यान महिलांसाठी विशेष आसनव्यवस्था तसेच सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून प्रथोमोपंचारासाठी विशेष आरोग्य पथकाचे नियोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात विविध कलाकार आपली हजेरी लावणार असून यंदाच्या स्वाभिमान दहीहंडी महोत्सवाचे हे विशेष आणि खास आकर्षण म्हणजे सहभागी होणारे विविध गोविंदा पथक असणार आहे. याशिवाय केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ मंत्री डॉ. भागवत कराड गृह निर्माण मंत्री अतुल सावे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, पोलीस आयुक्त मनोज लोहिया , तसेच महापालिका आयुक्त जी.श्रीकांत यांचीही यावेळी प्रमुख उपस्तिती राहणार आहे. या दहीहंडी महोत्सवात गोविंदा पथकाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व स्वाभिमानाने यंदाचा दहीहंडी महोत्सव साजरा करावा असे आवाहन स्वाभिमान क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद राठोड, उपाध्यक्ष धनंजय अतकरे, संस्थापक सचिव विशाल दाभाडे, नवनिर्वाचित अध्यक्ष समीर लोखंडे, कार्याध्यक्ष अमर ठाकूर, उपाध्यक्ष अभिजित खरात, नितेश टेकाळे, सचिव विक्रांत पंजाबी यांनी केले आहे.