आजपासून चार दिवस रंगणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात कलाविष्कार ; युवक महोत्सवाला थाटात प्रारंभ ; २५० कॉलेजची नोंदणी

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.४
छत्रपती संभाजीनगर | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या युवक महोत्सवाला विद्यापीठात बुधवारपासून प्रारंभ झाला. या महोत्सवात २५० महाविद्यालयांनी नोंदणी केली असून ४ ते ७ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या महोत्सवात सहा कला गटात ३६ प्रकारच्या स्पर्धा होणार आहेत. यासाठी सहा रंगमंच उभारले आहेत. यामध्ये नृत्य, नाट्य, संगीत, वाङ्मय, ललित कला व महाराष्ट्राच्या लोककलांचा समावेश आहे. मराठवाड्याचे भूमिपुत्र, अभिनेते योगेश शिरसाट, अभिनेत्री अनुष्का सरकटे यांच्या हस्ते या मोहोत्सवाचे थाटात उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी कुलगुरू प्रमोद येवले यांची अध्यक्षस्थानी उपस्थिती होती.
मोहत्सवाच्या उद्घाटना पूर्वी कलावंतांचा सहभाग असलेल्या शोभा यात्रेने प्रत्येकाचे लक्ष वेधले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मुख्य रंगमंचापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी मराठवाड्यातील विविध महाविद्यालाच्या विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. भगवान साखळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. योगिता होके-पाटील, अॅड. दत्ता भांगे यांचीही उपस्थिती होती. ७ ऑक्टोबर रोजी अभिनेत्री वर्षा उसगावकर, अभिनेते प्रवीण डाळिंबकर यांच्या उपस्थितीत या युवक महोत्सवाचा समारोप होणार आहे.