आम्ही काय नुसत्या सतरंज्याच उचलायच्या का ; शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे उमेदवार प्रदीप सोळुंके यांचा सवाल ; सोळुंखेची राष्ट्रवादीतून हकालपट्टी ; १४ उमेदवार निवडणूक रिंगणात

सचिन एस. अंभोरे | लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर | दि. १६ : मराठवाडा शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे उमेदवार प्रदीप सोळुंके यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने सोमवारी (दि.१६) कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी विक्रम काळे यांना दिली असतांना सोळुंके यांनी आपला अर्ज शेवटच्या दिवशीही मागे घेतला नसल्याने हि कारवाई करण्यात आली आहे. मात्र आम्ही काय नुसत्या सतरंज्याच उचलायच्या का? असा उद्विन्ग्न सवाल उमेदवार प्रदीप सोळुंके यांनी उपस्थित केला आहे. संधी हि खेचून आणावी लागते हे शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर मी आपला अर्ज भरला असून पवार यांचा हा आदेश पाळण्यासाठी मी निवडणूक रिंगणात उतरलो असल्याचे राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेले उमेदवार सोळुंके म्हणाले.
मराठवाडा शिक्षक निवडणूक उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवारचा अखेरचा दिवस होता. मात्र आपल्या उमेदवारी अर्जावर ठाम राहत अनेकांनी शिक्षक निवडणुकीत आजवर वर्चस्व राहिलेल्या विक्रम काळे यांच्या विरोधात आपले दंड थोपटले आहे. मराठवाडा शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत आता तब्बल १४ उमेदवार उतरले असून गेल्या अनेक वर्षापासून मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे विक्रम काळे यांच्या समोर भाजपचे किरण पाटील, राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेले प्रदीप सोळुंके, अपक्ष उमेदवार मनोज पाटील आणि संजय तायडे यांचे आव्हान असणार आहे. त्यामुळे हि निवडणूक येत्या काळात चांगलीच चुरशीची ठरणार असून गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या शिक्षकांच्या प्रश्नांना सोडवणाऱ्या उमेदवाराला शिक्षक पसंती देतील का याकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागून राहिले आहे.