ग्रामीण कवितेत प्रथमच विद्रोहाचा ‘बिगूल’ वाजवणारा कवी ललित अधाने

समकाळातील अत्यंत संवेदनशील कवी आणि ललित साहित्याचे अभ्यासक डॉ. ज्ञानेश्वर खिल्लारी यांनी 'माही गोधडी छप्पन भोकी' या डॉ.ललित अधाने यांच्या कविता संग्रहावर केलेले भाष्य....

डॉ. ज्ञानेश्वर बाबुराव खिल्लारी | लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क 

कवी ललित अधाने यांना ‘ कुणबी बाप’ ग्रामीण कवितासंग्रहाने महाराष्ट्रात ग्रामीण कवी म्हणून नावलौकिक मिळवून दिला. ‘कुणबी बाप’ या कविता संग्रहानंतर जवळजवळ दोन दशकानंतर ‘माही गोधडी छप्पन भोकी’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. या संग्रहातील प्रत्येक कवितेचा सर्वप्रथम मी श्रोता आहे. या कवितासंग्रहाला अल्पावधीतच अनेक प्रतिष्ठा प्राप्त पुरस्कार मिळाले. या कवितासंग्रहाची पहिली आवृत्ती अवघ्या एक महिन्यात संपली. दुसरी आवृत्ती येत आहे. या कवितासंग्रहाला डॉ. कैलास अंभूरे यांची विस्तृत व वस्तुनिष्ठ अशी प्रस्तावना लाभलेली असून मुखपृष्ठावरील व कवितासंग्रहाच्या आतील भागात सरदार जाधव यांचे आशय पूर्ण रेखाटने आहेत.

‘माही गोधडी छप्पन भोकी’ या शीर्षकानुसारच या कवितासंग्रहात एकूण ‘छप्पन्न’ कवितांचा समावेश करण्यात आलेला आहे. कविता चार विभागात विभागल्या असून सर्वच विभागाला वेगवेगळी शीर्षके देण्यात आलेली आहेत. ‘बिगूल’ या भागात दहा कविता आहेत तर ‘झ्याट मारी झिंगा’ या भागात अकरा कविता आहेत. ‘एन- ए लेआउट’ या भागात चोवीस कविता असून ‘दुःखाच्या ऐरणीवर’ या चौथ्या भागात अकरा कवितांचा समावेश करण्यात. ‘माही गोधडी छप्पन भोकी’ या संग्रहातील अर्पणपत्रिकेत ललित अधाने म्हणतात त्याप्रमाणे “शेतकरी आंदोलनात बळी पडलेल्या तमाम शेतकरी बांधवांना…”संग्रहातील सर्वच कविता या शेतकरी व त्यांच्यावर आजवर झालेल्या अन्यायाचं फक्त वर्णन करत नाहीत तर त्या विरोधात प्रखर विद्रोह नोंदवितात. जागतिकीकरण, खाजगीकरण, बाजारीकरण, यांत्रिकीकरण, शासन व्यवस्थेचा सत्तापीपासूनपणा व प्रशासनाचा सावळा ( सगळेच ऑनलाईन भ्रष्टता) गोंधळ, ऑनलाईनच्या माध्यमातून शेतकऱ्याची पिळवणूक यामुळे सगळंच अत्याधुनिक झाले असले तरी आमचा शेतकरी आजही आधुनिक झालेला दिसत नाही. याचे वास्तव चित्रण कवी ललित अधाने यांच्या कवितासंग्रहातून मुखर झाले आहे. सर्वच कविता प्रस्थापित समाज व्यवस्थेवर विद्रोहाच्या माध्यमातून प्रखर प्रहार करताना दिसतात. इंडिया आणि भारत यातला फरक मिटवण्यासाठी नव्यानेच रणशिंग फुंकण्याची भाषा कवी येथे करताना दिसतो. आता कोणाचाही अत्याचार सहन करायचा नाही आणि कुणाच्याही दबावाला बळी पडायचं नाही म्हणून कवी म्हणतो-

“आता आऱ्या खायच्या न्हाई
लगाम हाती द्यायचा न्हाई
झ्याट मारी झिंगा
** पिंगा”

कवितेची भाषाही विद्रोही व्यवस्थेविरुद्ध आसूड ओडताना दिसते. आता शेतकरी आंदोलनातून शेतकरी कष्टकरी शासन व्यवस्थेवर तुटून पडलेली आहे आता कितीही रक्ताचे पाठ वाहिले तरी माघार नाही

“फडकला लाल रक्तीम निशान
बांध पेटले राना रानातून
धारदार भाल्याची टोकं
निघालीत पानापानातून”

वर्षानुवर्ष इथला शेतकरी आपल्याकडे आईवर जीवापाड प्रेम करत आलाय. शेती हाच त्याचा उदरनिर्वाहाचा कायमस्वरूपी आधार राहिलेला आहे. याच शेतीला इथल्या बिल्डर लॉबीने शासनाच्या नाकारतापणामुळे विकासाच्या नावाने लुबाडून घेतलेले आहे. शेतकऱ्याला शेती करण्यासाठी शास्वत स्वरूपाचे पाणी उपलब्ध नाही, शेतमालाला भाव नाही, कर्जमाफीचे गाजर दाखवून शेती परवडणारी नाही हेच सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो.

“एक जण म्हणाला
शेतात राम राहिला नाही
मग वर्षानुवर्ष
बाप रानात काय हुडकतोय?”

या चार ओळीतल्याच कवितेतून अधाने यांनी सद्य स्थितीत शेतीची,शेतकऱ्याची अवस्था टिपलेली आहे. पिढ्यानपिढ्या इथला शेतकरी रोज शेतात रक्ताचे पाणी करतोय शिवाय कोणत्याही नफा, तोट्याचा विचार न करता आपल्या शेतीमातीला जपत आलाय. त्याच्या डोक्यात कधीच शेती विकण्याचा विचार येत नाही. पण ही व्यवस्था त्याला चोहोबाजूने घेरत आहे. शिल्लक काहीच उरत नसेल तर मग त्याला हा वेगळा विचार करायला येथील व्यवस्था भाग पाडत आहे…

“आमच्या हजारो पिढ्या
अशाच गेल्या मातीत
आता मीही करतो विचार
करून टाकावा एकदाचा
एन – ए – ले आऊट
शिल्लक उरतच नसेल तर”

या देशात लोकशाही आहे म्हणूनच येथील सगळ्याच व्यवस्थेवर शेतकरी विश्वास ठेवून आहे. असे असले तरी अजूनही लोकशाहीचा कोणताच स्तंभ शेतकऱ्याची बाजू घेताना दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे. कांदा, तूर, कापूस, गहू, ऊस इत्यादी नगदी पिकांना हमीभाव नाही. कांदा, तूर बऱ्याच वेळेला मातीमोल भावाने विकावा लागतो. क्वचित प्रसंगी या पिकांचे भाव वाढले तर इथला इंडिया आरडा ओरड करायला लागतो व मीडिया त्यांच्या मागे मागे धावत पळतो…

“कांदा महागला म्हणून
पेपर वाले, चैनल वाले
पंचांग वाले
ओकू लागले आग
शब्दाच्या फुत्काराने
जाळू लागले बाग”

शेतात राबणारा शेतकरी नेहमीच आसमानी सुलतानिशी संघर्ष करत आलाय. त्याच्या ठाई संघर्ष हा आयुष्यभर पाचीला पुजलेलाच असतो. त्याच्यावर होणारे अन्याय तो उघड्या डोळ्यांनी सतत बघतच आला आहे. आता फक्त संघर्ष करायचा नाही तर त्या विरोधात लढा उभारायचा विचार आता आधुनिक शेतकरी करायला लागलाय. हा विद्रोहच कवी ललित आधाने यांच्या कवितेतून चित्रित झालेला आहे. आधुनिक भारतातील शेतकरी आता पेटून उठलाय आणि इंडिया आणि भारत यांच्यातला फरक मिटवण्यासाठी क्रांती करू पाहतोय.

“आता आमच्या मस्तकात
पेटलेत लाखो सूर्य
मळ्याने फुंकले रणशिंग
हजार हत्तीचं बळ
आलंय बाहुत
बैलाच्या शिंगाच्या
झाल्यात मशाली
धमण्या -धमन्यातून
पसरतोय अग्नीलोळ
इंडिया अन भारत
यातला
फरक मिटवण्यासाठी “

इथले राजकारणी, व्यापारी, उद्योगपती हेच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची छुपे शत्रू आहेत. इथल्या राजकारण्यांना शेतकऱ्याची आठवण फक्त मतदानाच्या वेळेला होते. व्यापारी तर नेहमीच शेतकऱ्याच्या मुळावर उठलेला असतो. शासन व्यवस्थेला आपल्या काखेत घेऊन येथील उद्योगपतीने इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी मातीमोल भावाने खरेदी करून शेतकऱ्याला भूमीहीन करून टाकले आहे. असे अनेक आसमानी आणि सुलतानी शत्रू शेतकऱ्यांच्या जमिनीवर आपले बिराडे आणून बसतान मरित आहे आणि शेतकरी मात्र परागंदा होत चालला आहे.

“छुप्या शत्रूवर चालवू
तलवारीची पाती
विवेकाचा प्रहार करुनी
उधळून टाकू बिऱ्हाडे”

शेतकऱ्यांना लुबाडणारे खऱ्या अर्थाने हेच सगळे चोर आहेत. सगळे मिळून शेतकऱ्याला लुटण्याचे काम अगदी शांततेत चालू आहे. अजूनही पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकरी बाप आशेवर जगतोय आणि आपल्या शेतीवरचा प्रेम कमी करत नाही. राजकीय, नेते, व्यापारी, कृषीअधिकारी दुकानदार,तलाठी, ग्रामसेवक इ. यांनी शेतकरी वर्गाला लुटून टाकण्यासाठी आपले बिराड थाटलेले आहेत. याच छुप्या शत्रूंची बिराडे उधळून टाकण्याची भाषा कवी करत आहे.

“त्यांच्या आयुष्यात
कुठलाच आजूबा
होत नाही
तू फक्तस्त असतो बसून
मनाच्या बंदुकीत
बारूद ठासून”

स्वातंत्र्यानंतर या देशात अनेक बदल झाले, जवळजवळ सर्वच क्षेत्रांमध्ये विकास होताना दिसतोय. शहरांची झगमगाट वाढली. बहुमजली इमारतींची मनोरे चे मनोरे उभे राहत आहेत. गाव आणि खेडे यातले अंतर कमी होऊन खेडे शहराच्या घशात हळूहळू चाललंय. खेडेही आधुनिक रूप घेऊ पाहते. पण इथला शेतकरी स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यानंतर जसा होता तसाच आजही आहे. शेतकरी आत्महत्या थांबत नाही. शेतकऱ्याची पिळवणूक थांबत नाही. पारंपरिक शेती करणारे शेतकरी मनात सगळं साठवून असतो. पण तो व्यक्त होत नाही…

“हातात मेणबत्ती ऐवजी
घेऊन येतील
सेज
डीएमआयसी
समृद्धी
स्मार्ट सिटी
अन मारणाअंती
बापाच्या समाधीलाही
जागा उरणार नाही”

विकासाच्या थापा मारीत इथली शासन व्यवस्था, उद्योगपती हळूहळू इथल्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या उरावर बसायला आलेत. डी. एम. आय. सी., समृद्धी, स्मार्ट सिटीच्या नावाखाली इथल्या हजारो शेतकऱ्यांचे करोडो एकर शेती त्यांच्या डोळ्यात देखत लुटण्यात आली. इथल्या शेतकऱ्यांना तर प्रस्थापित समाज व्यवस्थेने रस्त्यावर आणले. कवी नेमके त्यावर बोट ठेवून निर्देश करताना इथल्या शेतकरी बापाला त्याच्या मरण्याअंती समाधीला सुद्धा जागा उरणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे वर्णन करतो…

“जे दिसलं ते घ्या
विद्रोहाची अफू प्या
स्वाभिमानाचा गांजा ओढा
वाटेत येईल त्याला
खुशाल झोडा “

कवीला याची प्रचंड चिड येते म्हणून तो विद्रोहाची भाषा आता बोलू लागतो…. येथील कृषक व्यवस्थेला व कृषकाला नेस्तनाबूत करणाऱ्या व्यवस्थेतील प्रत्येकाला विद्रोहाची अफू घेऊन वाटेत येईल त्याला आडवं करण्याची भाषा कवी करतो…

“मी हे हलाहल का प्यावं
आता मी टाकून देईन कुळव
अन घेईल हातात लेखणी
काम निष्पळ ठरवल्यावर
सपासप वार करायला
सपासप वार करायला”

शतकानू शतके होत असलेल्या अन्यायाला आता इथला शेतकरी वैतागला आहे हे कवी ललित अधाने यांच्या प्रत्येक कवितेतून जाणवते. हा विद्रोह केवळ एका कवीचा नसून शेतकरी बापाच्या मुलाचा विद्रोह आहे. आणि म्हणून ही संवेदनशीलता, कळकळ त्यांच्या कवितेतून शब्दा शब्दातून व्यक्त होते. आजा, पंजा, खापरपंजा, मी आणि माझी मुले आतापर्यंत सगळे भोगत आलोय. आणखी किती दिवस हे सहन करायचे हातातलं कुळव बाजूला ठेऊन मी माझ्या लेखणीने या संपूर्ण व्यवस्थेवर वार करण्यासाठी तयार झालोय.
कवितेतील बोली भाषेतील सौंदर्य व बोलीभाषेतील शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामाला लागणारी साधनं व्यवस्थेच्या विरुद्ध विद्रोहासाठी प्रतिमा रूपाने शस्त्र रूपान येताना दिसतात. कवितेतील विद्रोह हा अस्त्राचे शब्द बनून रक्तरंजित क्रांतीची भाषा करतो आहे. मोगरा, नांगर, चाबूक, चावऱ्या, आसूड, रूम्हणं, इळत, कुराड, कोयता, हातोडा, घन, खुटा, पाचर, शिवळा, तलवार, शिंग, भाला, लेखणी इ.
याशिवाय ग्रामीण बोलीतील शब्द माहित असलेले अथवा माहीत नसलेले संत आवजारे ललित अधाने यांच्या कवितेत प्रतिके, प्रतिमा माध्यमातून आलेले आहेत. उदा. कुळव,उपनेर, पेरा, वाफेवर, गाभडून, तिफन, मोगडा, राहक्या, गाभण, बरगड्या, कलई, नाडा, दावं , सौंदर, गांडयेठण, तंडरणं, तिव्हा, तीवई, माचा, वासे, सुव्वा, फासे, ऐरण, भाता, भरडा, धांडोर, औत, मचान, मेढा, रास,फाळ, आखर, दावणी, पसा, डेग, पोटार्यात, ठुसा, आधन, चाडं, कुबुंडी, आख, वंगण, तुंब, चकऱ्या, तारचूक, आखरी पेटी, पांजरी, साटा, छकडा, खुटल्या, धुऱ्या, जोतं, आरे, पाठे, ढूसण्या, खंडीखंडी, पांभर, फसाठी, बांडगुळ, मातेरं, भाकड इ. बोली भाषेचे सौंदर्य अधाने यांच्या कवितासंग्रहातून आवतरलेले आहे.

“मी मात्र आता
सहा महिने शेती
अन
सहा महिने युद्ध करायचे म्हणतोय
लेखणीचं हत्यार घेऊन…”

कवी ललित अधाने हे ग्रामीण भागातून आलेले असल्यामुळे शेती, शेतकरी आणि त्यांच्या मागील चार-पाच दशकातील विवीध प्रश्नांची, समस्यांची त्यांना जाणीव आहे. ‘माही गोधडी छप्पन भोकी’ या कवितासंग्रहातून केवळ त्या समस्यांचे रडगाणे येत नाही तर आता सगळे सहन करण्याच्या पलीकडे गेलेले आहे म्हणून विद्रोहाचा ‘बिगूल’ शब्द माद्यमातून वाजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. राजकीय, समाजिक, ओद्योगिक इ. व्यवस्थेवर शेतकऱ्यांचा विश्वास उरलेला नाही. कवी अधाने आता मात्र शेती करण्याबरोबरच या संपूर्ण व्यवस्थेविरुद्ध युद्ध करण्याची भाषा करतोय. एकूणच अलीकडील काळातील ग्रामीण कवितेतील प्रखर विद्रोह व्यक्त करणारा हा कवितासंग्रह आहे असे म्हणता येते.

——————————-
||’माही गोधडी छप्पन भोकी’||
कवी ललित अधाने
पृष्ठ – १५६
अक्षर वाङ्मय प्रकाशन, पुणे
किंमत-३०० रुपये
====================
@डॉ. ज्ञानेश्वर बाबुराव खिल्लारी
देवगिरी महाविद्यालय,
छत्रपती संभाजीनगर
मो.9404020363

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!