डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या ‘युवा महोत्सव’चे थाटात उदघाटन ; चार दिवस तरुणाईचा जल्लोष

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.२६
छत्रपती संभाजीनगर | डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन पोलीस आयुक्त प्रवीण कुमार यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. पुढील चार दिवस तरुणाईच्या उत्साहात विद्यापीठ परिसर गजबजून जाणार आहे. नाटयशास्त्र विभागाच्या शेजारी उभारण्यात आलेल्या ’सृजनरंग’ या मुख्य रंजमंचावर बुधवारी (दि.२५) सकाळी हा सोहळा संपन्न झाला. बारा हजार चौरस फुटाचा मंडप खच्चून भरलेला होता.
’युवा महोत्सव’चा प्रारंभ पहिल्या दिवशी मनपा आयुक्त जी.श्रीकांत यांच्या हस्ते शोभायात्रेच्या उदघाटनाने करण्यात आला. ही शोभायात्रा सृजनरंगजवळ पोहचल्यानंतर मुख्य सोहळा सुरु झाला. यावेळी मंचावर उदघाटक पोलीस आयुक्त मा.प्रवीण पवार, अभिनेते मंगेश देसाई, अभिनेते धनंजय सरदेशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.योगिता होके पाटील, अॅड.दत्तात्रय भांगे, विद्यार्थी विकास संचालक डॉ.कैलास अंभुरे यांची उपस्थिती होती.
प्रारंभी उस्ताद झाकीर हुसेन, दिग्दर्शक श्याम बेनेगल व साहित्यिक डॉ.प्रभाकर मांडे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. ’इंद्रधनुष्य’ महोत्सवाच्या उत्तम आयोजनानंतर ’युवा महोत्सव’ अत्यंत उत्कृष्ट रितीने पार पाडणार यासाठी आम्ही सर्वजन प्रयत्नशील आहोत, असे प्रास्ताविकात डॉ.कैलास अंभुरे म्हणाले. चार जिल्हयातील २ हजार ३०३ विद्यार्थी कलावंत संघप्रमुख महोत्सवात सहभागी झाले आहेत, असेही ते म्हणाले. यावेळी डॉ.गणेश शिंदे यांनी दिग्दर्शीत केलेली ध्वनीचित्रफित दाखविण्यात आली. प्रा.पराग हासे यांनी सूत्रसंचालन तर कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांनी आभार मानले.
अभिनेते मंगेश देसाईचे अर्थसहाय्य…
युवा महोत्सवाचे उद्घाटक अभिनेते मंगेश देसाई यांनी एका गरजू विद्यार्थीनी कलावंतास अर्थसहाय्य करण्याची घोषणा यावेळी केली. नाटयशास्त्र विभागाची प्रथम वर्षांची विद्यार्थीनी हेमलता धामुणे हिचे शिक्षण व नृत्यशिक्षणासाठी आगामी दोन वर्षे ते अर्थसहाय्य करणार आहेत. याशिवाय मुंबईत येऊ इच्छिणा-या नवोदित युवा कलावंतासह आपल्यापरीने मदन करु, असे त्यांनी घोषित केले.
संघर्ष हेच कलावंताचे जीवन : मंगेश देसाई…
संघर्ष हा आपला ’चॉईस’ असतो, तेव्हाच आपल्या आयुष्यात बदल घडत असतो. मला अगदी युवक महोत्सवात सहभागी होण्यासाठी संघर्ष करावा लागला. मात्र आज महोत्सवाच्या उद्घाटनचा पाहुणा होता आले, हे या संघर्षाचे ’चीज’ आहे. कलावंताला नावलौकिक मिळण्यात ९९ टक्के नशबी तर केवळ एक टक्काच गुणवत्ता हे समीकरण असते. हे सर्व लक्षात घेऊन नाटयक्षेत्रात या, असे आवाहनही अभिनेते, निर्माते मंगेश देसाई यांनी केले.
पदवीला द्या कलेची जोड : प्रवीण पवार
नोकरी, उपजिविकेसाठी पदवी घेऊन नोकरी मिळविणे आपले ध्येय असते. मात्र उत्तम जगण्यासाठी, सर्वांगीणविकासासाठी एक तरी कला आपण जपली पाहिजे, असे पोलीस आयुक्त प्रवीण पवार म्हणाले. आपण महाविद्यालयातील जीवनात एनसीसी व फोटोग्राफी शिकलो म्हणूनच इथपर्यंत पोहोचलो आहे.
आत्मशोधाची सुरुवात म्हणजे महोत्सव : धनंजय सरदेशपांडे
युवक महोत्सवात सहभागी होणं ही आपल्या आत्मशोधाची सुरुवात असते. तेव्हा आपला ’फोकस’ नेमका ठेवा. ’सातत्य, ध्यास व अभ्यास’ ही त्रिसूत्री तुम्हाला जीवनात यशस्वी करील, असे अभिनेते धनंजय सरदेशपांडे म्हणाले.
एकांकिका महोत्सव घेणार : कुलगुरू डॉ विजय फुलारी….
मराठवाड्यात एकांकिका स्पर्धा,महोत्सवच्या माध्यमातून अनेक कलावंत घडले मात्र आता अशा स्पर्धा होत नाही. या स्पर्धा सुरु कराव्यात, असे आवाहन मंगेश देसाई यांनी केले. आगामी काळात विद्यापीठाच्या वतीने एकांकिका स्पर्धा घेण्यात येईल, असे कुलगुरू डॉ विजय फुलारी यांनी अध्यक्षीय समारोपात तात्काळ घोषित केले. एकवेळा जेवणाची पंगत चुकली तरी चालेल मात्र चुकीची संगत होऊ देऊ नका. तसेच नाट्यशास्त्र विभागास गतवैभव प्राप्त करून देऊ, असेही ते म्हणाले.
स्टेज क्रमांक दोन – लोकरंग
लोकरंग मंचावर आज दुपारी 2:30 ते 5:30 या वेळेत स्टेज क्रमांक 02 लोकरंग या ठिकाणी वासुदेव कला प्रकारात 19 महाविद्यालयाने सहभाग नोंदवला. यासाठी संयोजन समितीत डॉ. वैशाली बोदेले, डॉ. दिनेश सुरडकर. डॉ. मिलिंद वाव्हळे , डॉ. देवराज दराडे यांनी संयोजक म्हणून काम बघितले तर परीक्षक म्हणून रामराम ढाले, प्रकाश कातकडे, शंकर गिरी यांनी परीक्षण केले.
स्टेज क्रं ४ नादरंग
शास्त्रीय ताल वाद्यांनी घेतला हृदयाचा ठाव…
शिव स्तुती, परण, उठाव, चक्रधार, रेला, लग्गी, कुआड बिआड शास्त्रीय तालातील विविध लयकारी आणि तुकड्यांनी अख्ख्या सभा मंडपाने धरला ठेका… तबला, पखावज या तालवाद्यांना समर्पक संवादिनी लेहरासाथीने कानसेन सुखावून गेला.
स्पर्धेचे परीक्षण डॉ कृष्णराज अनवले, विकास बेलुकर, माधवराज नरवडे यांनी केले. नादरंगचे व्यवस्थापन डॉ वैशाली देशमुख, डॉ सुनील टाक, डॉ आनंद वाघ, डॉ कीर्तीमलिनी जावळे,डॉ सागर चक्रनारायण यांनी केले. या मंचावर ताल वादन स्पर्धेला दुपारी २ वाजता प्रारंभ झाला.या वेळी २५ संघांचे सादरीकरण झाले.कामधेनु कॉलेज ऑफ एज्युकेशन, सचिन ससाणे या विद्यार्थ्याने तबला वादन तीन ताल लयकारी बहारदार सादरीकरण केले.
———————–/
युवा महोत्सवात आज….
सेट क्रं.१ सृजनरंग (नाटयशास्त्र विभाग) – २६ डिसेंबर २०२४
सकाळी ९.०० ते दुपारी १.०० लावणी
दुपारी २.०० ते रात्री १०.०० लावणी
————
स्टेज क्रं.२ (लोकरंग नाटयगृह परिसर) – २६ डिसेंबर २०२४
दुपारी १.३० ते सायं.४.३० भजन
दुपारी ४.३० ते सायं.९.०० भारुड
सायं ९.०० ते सायं १०.०० पोवाडा
———————-
स्टेज क्रं.३ नाटयरंग (विद्यापीठ नाटयगृह) – २६ डिसेंबर २०२४
सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० एकांकिका
दुपारी ३.०० ते सायं ५.०० पाश्चात्य समूह गायन
सायं ५.०० ते रात्री १०.०० प्रहसन
————————-
स्टेज क्र.४ नादरंग (कबड्डी मैदान) – २६ डिसेंबर २०२४
सकाळी ९.०० ते सकाळी ११.०० लोक वाद्यवृंद
सकाळी ११.०० ते सांय ६.०० भारतीय शास्त्रीय गायन
सायं ६.०० ते रात्री ८.३० पाश्चात्य सुगम गायन
रात्री ८.३० ते रात्री १०.०० भारतीय सुगम गायन
———————–
स्टेज क्रं.५ शब्दरंग (क्रीडा विभाग) – २६ डिसेंबर २०२४
सकाळी ९.०० ते रात्री ९.०० कविता वाचन
सकाळी ११.०० ते दुपारी १२.०० प्रश्नमंजुषा-लेखी
————————-
स्टेज क्रं.६ ललितरंग (ललित कला विभाग) – २६ डिसेंबर २०२४
सकाळी ९.०० ते सकाळी ११.३० चित्रकला
दुपारी १२.०० ते दुपारी २.३० पोस्टर
दुपारी ३.०० ते सायं ५.३० स्पॉट फोटोग्राफी