बदनापूर शहरासह तालुक्यात अवैध धंदे बोकाळले ; पोलिसांचे मात्र दुर्लक्ष?

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. ७    

ॲड. अकरमखान पठाण | बदनापूर : शहरासह तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध धंदे बोकाळले असून त्यामुळे अनेकांचे संसार उघड्या वर आले आहेत. हे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात येऊन दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांची आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक, अवैध दारू, मटका, जुगार, अवैध वाळू उपसा, स्वस्त धान्याच्या काळाबाजार, वृक्षतोड आदी व्यवसाय मोठ्या प्रमाणात बोकाळले असल्याने अनेकांची संसार उद्ध्वस्त होत आहे. मात्र संबंधित शासकीय यंत्रणा डोळे बंद करून आहे. कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने अवैध धंदेवाल्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.

यामध्ये आर्थिक हितसंबंध गुंतले असल्यामुळे हा सर्व प्रकार राजरोसपणे सुरू असल्याचे दिसते. बदनापूर शहर, तालुक्यातील खेड्यांमध्ये बेकायदशीर अवैध रित्या व बनावट दारू विक्री केली जात आहे. यातून अनेकांना विविध आजारांनी घेरले आहे. गावातील तरुण पिढीही व्यसनाधिन होत आहे. आठवडी बाजारासह शहरात चोऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहे. दाभाडी, गेवराई बाजार, शेलगाव, वरुडी मदरसा आदी मार्गांवर अवैध वाहतूक केली जाते. तसेच गाडीचालक नियमबाह्यरीत्या प्रवासी कोंबून भरधाव वाहने दामटतात. यातून प्रवाशांचा जीवही धोक्यात आला आहे. तालुक्यातील संवेदनशील भागात मटका व पत्त्याचे डाव रंगत असल्याचे चित्र आहे. परंतु अर्थकारणामुळे पोलीससुद्धा याकडे लक्ष देत नाही. बदनापूर पोलिसांच्या या अकार्यक्षमतेला वरिष्ठांचेही अभय आहे, अशी शंका नागरिकांकडून व्यक्त होत आहे. वरिष्ठांकडून दखल घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तसेच बदनापूर शहर व तालुक्यात वाढत्या अवैध धंद्यांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. याबाबतची संपूर्ण माहिती असतानाही स्थानिक पोलीस प्रशासन मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. आता याकडे वरिष्ठांनीच लक्ष देऊन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याची मागणी जोर धरत आहे. अवैध दारूबाबत अनेक तक्रारी असताना पोलीसांसह उत्पादन शुल्क अधिकारी कार्यालयाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. शासकीय यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका घेते. लोकप्रतिनिधी सुद्धा याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे नागरिकांमधील रोष वाढतच असल्याचे दिसते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!