इतिहास मुलांना कळावा यासाठी तब्बल दहा वर्षांनी शिवपुत्र संभाजी महानाट्य छत्रपती संभाजी नगरात ; अभिनेते खा. डॉ. अमोल कोल्हे

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. २२
छत्रपती संभाजीनगर | तब्बल दहा वर्षानंतर शहरात शिवपुत्र संभाजी हे महानाट्य सादर होणार असून शाळेतील मुलांना स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींचा इतिहास प्रत्यक्षात कळावा यासाठी या महानाट्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अभिनेते खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. २३ पासून शहरात शिवपुत्र संभाजी हे महानाट्य बीड बायपास येथील जबिंदा लॉन्स येथे असून रोज एक प्रयोग २८ डिसेंबरपर्यत सादर होणार असल्याचे ते म्हणाले.
पुढे बोलतांना अभिनेते डॉ. अमोल कोल्हे म्हणाले कि, छत्रपती संभाजी महाराजांचा जाज्वल्य, धगधगता इतिहास या महानाट्यातून प्रत्येकाला कळेल. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास लहान मुलांच्या मनावर कोरला जाईल. आज शाळेतील अभ्यासक्रमात छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास नाही. आजच्या मुलांना खरा इतिहास माहिती होणे आवश्यक आहे. नाटकाच्या मनोरंजनातून संभाजींचा इतिहास समोर आणला जात आहे.

महानाट्यायासाठी १२० फुटी भव्यदिव्य किल्ल्याचा रंगमंच, खरी खुरी लढाई, घोडे यांचा वापर, चित्तथरारक घोडेस्वारी, संपूर्ण मैदानाचा रंगमंच म्हणून वापर, सोबत १५० पेक्षा जास्त कलाकारांचा सहभाग या महानाट्यात असणार आहे. दहा वर्षानंतर महानाट्य होणार आहे. डॉ. अमोल कोल्हे हे संभाजी महाराज भूमिकेत असून डॉ. गिरीश ओक औरंगजेबाची भूमिका निभावणार आहे. सोबतच प्राजक्ता गायकवाड, महेश कोकाटे, विश्वजीत फडते, अजय तपकीरे, रमेश रोकडे इत्यादी सिनेकलावंतांचा सहभाग या महानाट्यात असणार आहे. सध्या दोन मजले तयार झाले आहेत. आणखी दोन मजले तयार होईल. महानाट्याबद्दल आम्हाला देखील खूप उत्सुकता आहे. असे सांगत डॉ. अमोल कोल्हे म्हणाले कि, कोरोनानंतर पहिल्यांदाच मराठवाड्यात मोठा प्रयोग होत आहे. त्यातून प्रेरणा घेण्यासाठी एकदा तरी हे महानाट्य सहकुटुंब प्रत्येकांनी पाहावेच असे आवाहन त्यांनी केले. शहरातील प्रसिद्ध नाट्य आयोजक राजू परदेशी, अभिषेक परदेशी यांनी या महानाट्याचे नियोजन केले आहे.