मंत्री अतुल सावेंच्या घरासमोर ढोल वाजवून शिवभक्तांचा राज्यापालाविरोधात निषेध ; राज्यपाल हटाव महाराष्ट्र बचावची हाक

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.४ 

छत्रपती संभाजी नगर | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत आक्षेपार्ह विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्यानंतर राज्यातील वातावरण पेटले असून छत्रपती संभाजी नगर मध्ये समस्त शिवभक्तांनी सहकार व इतर मागासवर्ग मंत्री अतुल सावे यांच्या घरासमोर ढोल वाजवून राज्यपालांचा तीव्र भावनेत निषेध व्यक्त केला. यावेळी मंत्री सावे यांनी शिवभक्तांची भावना पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या पर्यंत पोहचवतो असे आश्वासन यावेळी आंदोलन कर्त्यांना दिले.

राज्यपालांनी छत्रपती संभाजी नगरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. राज्यपालांच्या या विधानामुळे राज्यभर मराठा क्रांती मोर्चा तसेच समस्त शिवभक्त प्रचंड आक्रमक झाले. राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव अशी हाक शिवभक्तांनी दिल्यानंतर जो पर्यंत राज्यपाल हटवणार नाही तोपर्यंत साप्ताहभर आंदोलन सुरु राहतील असा इशारा शिवभक्तांनी दिला आहे. राज्यपालानी शिवरायांबाबत केलेल्या अवमानाची माहिती आपणास आहे का ?असल्यास आपण राज्यपाल हटावची मागणी केली आहे का? असा प्रश्न समस्त शिवभक्तांच्या वतीने विनोद पाटील यांनी मंत्री अतुल सावे यांना विचारून आपला रोष व्यक्त केला. यावर शिवभक्तांची भावना मी पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या पर्यंत पोहोचवेल असे आश्वासन यावेळी मंत्री अतुल यांनी दिले. मात्र जोपर्यंत राज्यपालांची हकालपट्टी होत नाही तो पर्यंत राज्यपाल यांच्या विरोधात आंदोलन सुरूच राहीतील अशी भूमिका यावेळी शिवभक्तांनी स्पष्ट केली. सर्व मंत्र्यांच्या घरी जाऊन ढोल आंदोलनाने त्यांना जागे करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमान केल्याबाबतचा जाब विचारल्या जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. येत्या सप्ताहात संविधान वाचन, स्वाक्षरी मोहीम, काळे झेंडे आंदोलन याशिवाय विविध आंदोलने राज्यपाल यांच्या विरोधात करण्यात येणार असल्याचे शिवभक्तांच्या वतीने विनोद पाटील यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!