आग्रा येथील ऐतिहासिक किल्ल्यात सलग तिसऱ्या वर्षी थाटामाटात साजरी होणार शिवजयंती
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि अभिनेते विकी कौशल असणार प्रमुख पाहुणे

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.१६
छत्रपती संभाजीनगर | संपूर्ण राष्ट्राचा गौरव असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सलग तिसऱ्या वर्षी उत्तर प्रदेशातील आग्रा येथे ऐतिहासिक किल्ल्यात थाटामाटात साजरी होणार असल्याची माहिती अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी प्रसार माध्यमांना रविवारी (दि.१६) दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान तळपलेल्या आणि महाराष्ट्राची अस्मिता जागवणाऱ्या आग्रा किल्ल्यात हा भव्य सोहळा अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि ‘छावा’ चित्रपटात छत्रपती संभाजीराजेंची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते विकी कौशल हे मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
शिवजयंती सोहळ्याची वैशिष्ट्ये:
- छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम
- सुप्रसिद्ध गायक नितीन सरकटे व उत्कर्ष शिंदे यांचे गायन.
- शिव जन्माचा पाळणा आणि ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र गीताचे सादरीकरण
- ‘अफझल खान वध’ प्रसंगाचे नाट्यरूपांतर
- कोल्हापूरच्या सब्यसाची गुरुकुलकडून पारंपरिक मर्दानी खेळाचे सादरीकरण
- शिवछत्रपतींच्या जीवनावर आधारित दीपोत्सव व डिजिटल आतषबाजी
असा असेल कार्यक्रमाचा वेळ आणि स्वरूप :
- संध्याकाळी ६:०० वाजता सुरुवात – शिवरायांवरील गीतगायनाने कार्यक्रमाची सुरुवात
- दीपप्रज्वलन व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत
- शिवछत्रपतींच्या जीवनावर आधारित पोवाडे आणि नाट्यरूपांतर
- शिव जन्माचा पाळणा आणि ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ गीताचे सादरीकरण
- मर्दानी खेळाचे थरारक सादरीकरण
- विविध मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
- कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने
या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार होण्यासाठी जगभरातील शिवप्रेमी फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि YouTube या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे लाईव्ह सहभागी होतील. विविध वृत्तवाहिन्यांवरूनही या शिवजयंती सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.