“माही गोधडी छप्पन भोकी” काव्यसंग्रहाचे किशोर कदम यांच्या हस्ते प्रकाशन ; २२ ऑक्टोबर रोजी तापडिया नाट्य मंदिरात समारंभ

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.१२
छत्रपती संभाजीनगर | मराठवाड्यातील प्रसिद्ध कवी, लेखक, गीतकार प्रा.डॉ. ललित अधाने यांच्या “माही गोधडी छप्पन भोकी” काव्यसंग्रहाचा प्रकाशन समारंभ प्रसिद्ध कवी, गीतकार व सिने अभिनेते किशोर कदम ऊर्फ सौमित्र यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती डॉ. विठ्ठल व डॉ. अनिरुद्ध मोरे यांनी दिली.
डॉ.ललित अधाने हे १९९० नंतरच्या पिढीतील एक महत्त्वाचे कवी असून त्यांचा यापूर्वी “कुणबी बाप” हा काव्यसंग्रह प्रचंड गाजला. विविध विद्यापीठांमध्ये त्यांच्या कवितेचा अभ्यासक्रमातही समावेश झालेला आहे. त्यांच्या या काव्यसंग्रहास कुसुमाग्रज काव्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण काव्य पुरस्कार यासारखे नामांकित पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. तसेच ‘नाट्यानुबंध’ हा समीक्षा ग्रंथ तर ‘वाडमयीन प्रवृत्ती तत्त्वशोध’ या ग्रंथाचेही त्यांनी संपादन केले. सदरील प्रकाशन समारंभ निराला बाजार येथील तापडिया नाट्यमंदिरात रविवार, २२ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजता आयोजित केलेला असून या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील तर प्रमुख उपस्थिती म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व कार्यवाह डॉ. दादा गोरे, अक्षरवाङमय प्रकाशनचे बाळासाहेब घोंगडे हे राहतील. समीक्षक व कवितारती या नियतकालिकाचे संपादक डॉ. आशुतोष पाटील , मराठी भाषा व साहित्याचे अभ्यासक डॉ. कैलास अंभुरे हे भाष्य करतील.
या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन सह्याद्री साहित्य, कला आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान, अक्षरवाङमय प्रकाशन, पुणे,मराठवाडा साहित्य परिषद शाखा- खुलताबाद. प्रगतीशिल लेखक संघ, तिफण वाचक चळवळ , कन्नड. उन्मनी प्रतिष्ठान, विश्व मराठी अध्यापक परिषद,अ.भा. बहुजन साहित्य परिषद, शताब्दी काव्य मंडळ, समस्त गावकरी मंडळ संगमेश्वर विरमगाव आणि कवितेवर नितांत श्रद्धा असलेला साहित्यस्नेही गोतावळा यांनी केले आहे.