शरद पवारांची राजकारणातून निवृत्तींची घोषणा ; कार्यकर्त्यांना अश्रू अनावर ; निर्णय मागे घेण्यासाठी पवारांची मनधरणी

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. २
मुंबई | लोक माझे सांगाती या शरद पवारांच्या आत्मचरित्र पुस्तक प्रकाशन प्रसंगी आपले अनुभव व्यक्त करतांना राष्ट्रवादी कॉंग्रेस चे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसभेनंतर आता कोणती मोठी जबाबदारी नको असे विधान करत राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली मात्र पवारांच्या या निर्णयाचा विरोध करत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यानी हा निर्णय घेण्यासाठी पवारांची मनधरणी करून सभागृहातच ठाण मांडले. जोपर्यंत हा निर्णय मागे घेणार नाही तोपर्यंत कुणीही घरी जाणार नाही असा पवित्रा घेतला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेकांना अश्रू अनावर झाले. पवारांच्या घोषणांनी यावेळी सर्व सभागृह दानाणून गेला.
शरद पवारांच्या छायेखाली आजवर आम्हाला राजकारणात काम करण्याची सवय पडली आहे. त्यामुळे तुम्ही असा एकाकी निर्णय घेऊ शकत नाही अशी भावना यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केली. यावेळी माजी गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनाही अश्रू अनावर झाले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, राजेश टोपे, सुनील तटकरे, यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस चे पदाधिकारी उपस्थित होते.
काय म्हणाले पवार….
मी असे स्पष्ट सांगितले कि आपण सर्व एकत्रित पक्षात काम करणार आहोत. मी फक्त पदावरून बाजूला होतोय. मी पक्षापासून बाजूला नाही…तुमच्यापासून बाजूला नाही, तुमच्या सर्व कामाला, तुमच्या सर्व कार्यक्रमाला मी तुमच्या बरोबर आहे… राजकारणात सक्रीय आहे… पवारांच्या या वक्तव्यावर कार्यकर्त्यांनी मात्र आपल्या तीव्र भावना व्यक्त करत पवारांना मनवण्याचा प्रयत्न केला.