९ व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आज उद्घाटन ; गीतकार जावेद अख्तर यांना प्रदान होणार पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.३

छत्रपती संभाजीनगर : जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन आज बुधवार, (दि.३) रोजी सायंकाळी ७.३०वाजता रूक्मीणी सभागृह, एमजीएम परीसर, छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे.

नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन व यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र छत्रपती संभाजीनगर प्रस्तुत व मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन आयोजित अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संपन्न होत असून प्रोझोन मॉल यांचे विशेष सहकार्य या फेस्टिव्हलला मिळालेले आहे. एनएफडीसी व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांची सहप्रस्तुती असणार आहे. डेली हंट डिजीटल पार्टनर आहेत. नाथ स्कूल ऑफ बिजनेस मॅनेजमेंट अँण्ड टेक्नॉलॉजी (NSBT), अभ्युदय फाउंडेशन हे या महोत्सवाचे सह आयोजक आहेत. एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्टस या महोत्सवाचे अकॅडमीक पार्टनर तर एमजीएम रेडिओ एफएम ९०.८ हे रेडिओ पार्टनर आहेत.

उद्घाटन सोहळा व जीवन गौरव पुरस्कार :

या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिध्द हिंदी चित्रपट दिग्दर्शक आर.बाल्की यांच्या हस्ते होणार असून या प्रसंगी प्रसिध्द हिंदी चित्रपट दिग्दर्शक अनुभव सिन्हा, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत. यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रसिध्द गीतकार व पटकथाकार पद्मभूषण मा. जावेद अख्तर यांना त्यांच्या भारतीय सिनेमातील अतुल्य योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून एनएफडीसीच्या वरीष्ठ अधिकारी गौरी नायर, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे, फिल्मसिटी मुंबईचे उप व्यवस्थापकीय संचालक संजय कृष्णाजी पाटील, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, महोत्सव संचालक अशोक राणे, महोत्सवाचे कलात्मक संचालक चंद्रकांत कुलकर्णी यांची उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळ्यानंतर अर्ध्या तासाच्या अंतराने आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे यावर्षीची जागतिक पातळीवरील नावाजलेली जर्मन भाषेतील फिल्म फॉलन लिव्हस फेस्टिव्हलची ओपनिंग फिल्म म्हणून प्रदर्शित केली जाणार आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर पुढील चार दिवस महोत्सव आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे संपन्न होईल. उद्घाटन सोहळ्यात सर्वांसाठी प्रवेश खुला असेल.

भारतीय सिनेमा स्पर्धा :

महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. महोत्सवात मागील वर्षाप्रमाणे भारतीय स्पर्धा गटाचा समावेश करण्यात आलेला आहे. यात विविध भारतीय भाषांतील नऊ सिनेमांचा समावेश असून पाच राष्ट्रीय पातळीवरील ज्युरी हे प्रेक्षकांसह चित्रपट पाहणार आहेत. यातील सर्वोत्त्कृष्ट भारतीय चित्रपटाला सुवर्ण कैलास पारितोषिक व एक लक्ष रूपये देण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट कलाकार (स्त्री/पुरुष) या वैयक्तिक पारितोषिकांचा देखील समावेश असणार आहे.

भारतीय सिनेमा स्पर्धा गट ज्युरी समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक धृ्रतीमान चॅटर्जी (कोलकाता) हे असणार आहे. तर ज्युरी सदस्य म्हणून प्रसिध्द छायाचित्रकार डिमो पापोव (झेक रिपब्लिक), ज्येष्ठ दिग्दर्शक नचिकेत पटवर्धन (पुणे), ज्येष्ठ समीक्षक रश्मी दोराईस्वामी (दिल्ली) व प्रसिध्द छायाचित्रकार हरी नायर (पणजी) हे मान्यवर असणार आहेत.

फिप्रेसि ही चित्रपट समीक्षकांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. फिप्रेसि भारत हे जगभरातील महोत्सवांमधून उत्तम चित्रपट निवडून त्यांना पुरस्कार प्रदान करतात. त्या पुरस्कारांना आंतरराष्ट्रीय सन्मान मानला जातो आणि अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी यंदाच्या वर्षी अतिशय अभिमानास्पद बाब अशी की, या पुरस्कार निवडीसाठी फिप्रेसिने अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची निवड केली आहे. त्यांचे तीन विशेष ज्युरी महोत्सवातील (भारतीय सिनेमा स्पर्धा गट वगळता) इतर चित्रपटांकरीता विशेष परीक्षण करणार आहेत. या समितीचे ज्युरी अध्यक्ष एन.मनू चक्रवर्थी (बंगळूरू), श्रीदेवी पी. अरविंद (कोचीन), सचिन चट्टे (पणजी) हे मान्यवर या समितीत असणार आहेत.

मास्टर क्लास व विशेष व्याख्यान :

महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत चित्रपट प्रदर्शनांबरोबरच विविध भरगच्च कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. गुरुवार, दि. ४ जानेवारी २०२४ रोजी दुपारी २ वाजता आयनॉक्स येथे पा, चिनी कम, घुमर, शामीताभ, पॅडमॅन या प्रसिध्द हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक आर.बाल्की यांच्या मास्टर क्लासचे आयोजन करण्यात आलेले आहे.

गुरूवार, दि. ४ जानेवारी २०२४ रोजी सायं ६ वा. आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे ज्येष्ठ गीतकार व संवाद लेखक पद्मश्री जावेद अख्तर यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक जयप्रद देसाई हे त्यांच्यासमवेत संवाद साधतील.

शुक्रवार, दि. ५ जानेवारी २०२४ रोजी दुपारी २ वा. आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे आर्टिकल १५, थप्पड, रा-वन, मुल्क या प्रसिध्द हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या मास्टर क्लासचे आयोजन करण्यात आलेले आहे.

शनिवार, दि. ६ जानेवारी २०२४ रोजी दुपारी २.३० वा. केंद्र शासन-पीआयबीचे वरिष्ठ अधिकारी प्रकाश मगदुम यांच्या गांधी आणि सिनेमा या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

शनिवार, दि. ६ जानेवारी २०२४ रोजी सायं. ६.३० वा. मीट द डिरेक्टर्स या सत्रात भारतीय सिनेमा गटातील सर्व दिग्दर्शकांसमवेत विशेष संवाद आयोजित करण्यात आला आहे. यावेळी चित्रपट रसिकांना या सिनेमांच्या दिग्दर्शकांसमवेत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधता येईल

रविवार, दि. ७ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२ वा. ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक ध्रृतीमान चॅटर्जी यांच्या मृणाल सेन समजून घेताना या विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. महान चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांच्या अनेक चित्रपटांमधून श्री.चॅटर्जी यांनी प्रमुख अभिनेत्याची भूमिका साकारली आहे.

प्रतिनिधी नोंदणी :

चित्रपट महोत्सवास उपस्थित राहण्याकरीता प्रतिनिधी नोंदणीची सुरूवात करण्यात आलेली असून जगातील व देशातील सर्वोत्कृष्ट सिनेमे रसिकांना बघता यावे, याकरीता सर्वसामान्य नागरिकांकरीता केवळ पाचशे पन्नास रुपये कॅटलॉग शुल्क आकारण्यात येणार आहे, तर ज्येष्ठ नागरिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात केवळ तीनशे पन्नास रुपयांत या महोत्सवाचा आनंद घेता येणार आहे. प्रतिनिधी नोंदणी सुरुवात झाली असून www.aifilmfest.in या वेबसाईट वर चित्रपट रसिकांना ऑनलाईन प्रतिनिधी नोंदणी करता येईल तर प्रत्यक्ष नोंदणी साकेत बुक वर्ल्ड (औरंगपुरा), तापडीया आयनॉक्स (सिडको), आयनॉक्स-रिलायन्स मॉल, आयनॉक्स-प्रोझोन मॉल व निर्मिक ग्रुप, व्यंकटेश मंगल कार्यालयासमोर, सुतगिरणी रोड येथे करता येईल.

संयोजन समिती :

छत्रपती संभाजीनगरचे नाव चित्रपट क्षेत्रात जागतिक व्यासपीठावर नेणार्या या महोत्सवात मराठवाड्यातील नागरिकांनी सहभाग नोंदवावा तसेच अधिक माहितीसाठी www.aifilmfest.in या वेबसाईटवर तसेच info@aifilmfest.in या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन महोत्सवाचे संस्थापक व संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम, सचिन मुळे, सतीश कागलीवाल, महोत्सवाचे संचालक अशोक राणे, आर्टिस्टीक डायरेक्टर चंद्रकांत कुलकर्णी, डॉ. अपर्णा कक्कड, आकाश कागलीवाल, डॉ. आशिष गाडेकर, महोत्सवाचे संयोजक नीलेश राऊत, क्रियेटिव्ह डायरेक्टर जयप्रद देसाई, ज्ञानेश झोटींग, शिव कदम, सुहास तेंडूलकर, डॉ. रेखा शेळके, प्रा. दासू वैद्य, प्रेरणा दळवी, डॉ. आनंद निकाळजे, शिवशंकर फाळके, सुबोध जाधव, नीना निकाळजे, डॉ. कैलास अंभुरे, निखिल भालेराव, अमित पाटील, किशोर निकम, अजय भवलकर, नीता पानसरे, निलीमा जोग आदींनी केले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!