बारा गाड्या ओढून नवस फेडत मुकुंदवाडी भवानी यात्रेला उत्साहात सुरुवात
राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते उदघाटन ; भवानी मातेच्या जयघोषात हजारो भाविकांची उपस्थिती

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. २२
*छत्रपती संभाजीनगर | गेल्या अडीचशे वर्षांपासून मुकुंदवाडी येथील श्रीक्षेत्र लक्ष्मीदेवी व बालाजी मंदिर संस्थानच्या वतीने आयोजित तुळजाभवानी माता यात्रेस परंपरेनुसार बारा गाड्या ओढून नवस फेडत उत्साहात सुरुवात झाली. बारा गाड्या सोहळ्याचे उदघाटन राज्यस्थान चे महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार नारायण कुचे यांच्यासह गावातील २२ नवसकऱ्यांनी भावपूर्ण श्रद्धेने आपला वंश परंपरागत तसेच कबूल केलेला नवस फेडला. यावेळी हजारो भाविकांनी भवानी मातेचा जयघोष केला. समस्त मुकुंदवाडी भवानी यात्रा उत्सव समिती तसेच ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
२४ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या यात्रेत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात पारंपरिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे. बारा गाड्या सोहळ्यात गावातील जेष्ठ देविदास जगताप, गंगाधर गायकवाड, साळूबा ठुबे, सुखदेव शिंदे, शेषराव ठुबे, रघुनाथ शिंदे, लक्ष्मण राते, पंढरीनाथ शिंदे, तुकाराम राते, उत्तमराव जगताप, भाऊलाल साळवे यांच्यासह गावकरी, तरुण मंडळी, महिला पुरुष भक्तांची व भवानी माता यात्रा उत्सव समितीची उपस्थिती होती. यावेळी गावातील भक्तांनी रेवड्या उधळून बारा गाड्यांचे स्वागत केले. गाड्या ओढण्यासाठी गावातील तरुणांची मोठी गर्दी दिसून आली. तर लहान मुले, महिला पुरुषांनी या बारा गाड्यावर फुलांची उधळण करून नवस करणाऱ्यांचे मोठ्या श्रद्धेने स्वागत केले.
यांनी फेडला नवस….
भवानी मातेच्या यात्रेत कबूल केलेला नवस मोतीलाल कुचे, रामदास कुचे यांनी गळ टोचून फेडला फेडला तर आमदार नारायण कुचे, पप्पूराज ठुबे, सचिन खोतकर, सचिन जऊक, दत्ता राते, सोनू दहीहंडे, ज्ञानेश्वर लामदांडे, सुभाष लामदांडे, राहुल लामदांडे, पवन गायकवाड, सत्यश्वर शिंदे, एकनाथ रोकडे, शिवराम म्हस्के, उमेश साळुंके, बाबासाहेब कर्जुले, कृष्णा गुळे, बंडू गुळे, किरण गायकवाड, ज्ञानेश्वर शिंदे, किरण गायकवाड, संतोष जगताप, संदीप शिंदे, रतन साळवे यांनी बाऱ्या गाड्या ओढून भवानी मातेचा नवस फेडला.
रात्री रंगला भंदे, व देवींची भव्य मिरवणूक…
मुकुंदवाडी भवानी मातेची भव्य मुरवणूक रात्री काढण्यात आली. यावेळी विविध सोंग घेऊन भाविकांनी सजीव देखावे सादर केले. तर पारंपरिक वाद्य आणि गाण्याच्या तालावर ठेका धरत भवानी भक्तांनी जल्लोष केला.
पहाटेपर्यंत रंगला गोंधळ, छंदबाजी, कलगीतुरा….
भवानी मातेच्या यात्रेमध्ये पारंपरिक गाणी, वाद्य यासाह विविध गोंधळ छंदबाजी आणि कलगी तुऱ्याला महत्व आहे. पहाटे पाच वाजेपर्यंत सवाल जावबाचाकलगी तुरा रंगला. तुनतुना, हलगी, संबळ टाळ, मृदूंग, यासह संबळ वाद्यातून भवानी मातेच्या यात्रेत जुन्या गाण्याचा आवाज निनादला.
दुकाने, खाद्य पदार्थ, पूजा साहित्याची दुकाने सजली…
भवानी मातेच्या या यात्रेमध्ये कुस्ती मैदान, विविध खेळणी, विविध वस्तूंची दुकाने, उपहार गृह, पूजा साहित्य विक्रीची दुकाने सजलेली पाहायला मिळाली. यात्रेमध्ये लागलेल्या लहान मोठ्या दुकानांमध्ये सायंकाळी महिला तरुणी यांच्यासह राज्यभरातून आलेल्या भाविक भक्तांची गर्दी पाहायला मिळाली.
जाहीर कीर्तन व लावण्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम…
बुधवार, दिनांक २३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता महाप्रसादाचे आयोजन भवानी माता मंदिर येथे आयोजित करण्यात आले असुन रात्री ७ वाजता पावनधाम डोंगरगावकर हभप प्रभाकर महाराज शास्त्री यांचे जाहीर कीर्तन होईल तर रात्री १० वाजता यात्रा मैदानावर पुण्याच्या युवा नर्तिका लावण्यवती ख़ुशी शिंदे व टीम विविध सांस्कृतिक, व बहारदार नृत्य सादर करतील.