२५ जानेवारी २०२५ रोजी सकल मराठा बांधवांनी अंतरवाली सराटीत दाखल होण्याचे मराठा योद्धा मनोज जरांगे यांचे आवाहन ; आता माझा शेवट झाला तरी चालेल पण मी आता मागे हटणार नाही

सचिन लिला सुखदेव अंभोरे | लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क
अंतरवाली सराटी | दि. २२ : २५ जानेवारी २०२५ रोजी माझे आमरण उपोषण सुरु होणार आहे. त्यामुळे कोणीही लग्नाची तारीख धरू नये. माझी सर्वाना विनंती आहे कि, या सरकारला आपली आता ताकद दाखवायची आहे. संपूर्ण भगवे वादळ या अंतरवाली सराटी मध्ये दिसले पाहिजे. मराठ्यांचा रोष आता कोणीही अंगावर घेऊ नका असा इशाराच मनोज जरांगे यांनी दिलाय. महाराष्ट्र भर गावा गावात माझे गाव माझी जबाबदारी या अनुषंगाने सकल मराठा बांधवांनी बैठका घ्याव्यात, या संदर्भातील पत्रिका छापून त्या त्या गावातील घराघरात पोहोचवाव्यात. ज्यांच्याकडे लहान मोठे वाहन असतील ते त्यांनी अंतरवाली सराटी मध्ये घेऊन यावेत. जर मराठा समाजाशी कोणी बेईमानी केली तर त्यांचा सामना थेट आता सरकार आणि सकल मराठा समाजाशी असणार आहे. असा ठाम निर्णय घेत मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी आपली आगामी भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट केलीय.
मराठा समाजाला धोका दिला त्यामुळे आता या सरकारला आम्ही सोडणार नाही. यापूर्वी मी खूप संधी दिली. आता काहीही एक मी कुणाचे ऐकणार नाही. माझ्या या आरक्षणाच्या लढाईत आता कोणीही मध्यस्थी करू नये. मला उपोषण सोडवायला पण कोणी येऊ नये असा इशाराही मनोज जरांगे यांनी राज सरकारला माध्यमांशी बोलतांना दिला. २५ जानेवारीला सगे सोयरे चा अध्यादेश निघण्यास १ वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने सर्व कामे उरकून घ्या. ज्यांना ज्यांना माझ्यासोबत उपोषणाला बसायचे असेल त्यांनी परत जाण्याचा विचार करू नये. आपल्या सर्व वस्तू सोबत घेऊन याव्यात. आता या सरकारला आरक्षण घेतल्या शिवाय आपल्याला त्यांना सोडायचे नाही. जर तुमच्या मध्ये धमक असेल तरच उपोषणाला या. घरचा विरोध होत असेल तर कोणीही उपोषणाला बसू नये. आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी आता मी मागे हटणार नाही. माझे खूप हाल झाले आहेत. माझ्या खूप वेदना आहेत त्यामुळे आता माझाही याच ठिकाणी शेवट होऊ शकतो. त्यामुळे मी आता मागे हटणारच नाही. अशा स्पष्ट शब्दात मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला ठणकावले आहे. शेतकरी मराठ्यानी सर्व कामे आता २५ जानेवारी २०२५ पर्यंत पूर्ण करून घ्या. व्यावसायिक असेल, नौकरदार असेल, कामगार असेल सर्वच मराठा बांधवांनी महाराष्ट्र राज्यातील काना-कोपऱ्यातून अंतरवाली सराटी येथे दाखल व्हावेच. असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे.