हजारो वाहनांचा ताफा घेऊन समृध्दिमार्गे इम्तियाज जलील यांची तिरंगा रॅली मुंबईकडे रवाना

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. २३
छत्रपती संभाजीनगर | सोमवारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या निवासस्थानापासून समृध्दीमहामार्गे तिरंगा रॅली मुंबईकडे रवाना झाली आहे. यावेळी रस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विवादास्पद वक्तव्य करणाऱ्या बाबा रामगिरी व नितेश राणे यांना तात्काळ अटक करा या मागणीसाठी दहा हजार वाहनांचा ताफा घेऊन तिरंगा रॅली निघाली असल्याची माहिती एमआयएमचे शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी यांनी दिली.
तिरंगा रॅली निघण्यापूर्वी इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले आम्हाला राज्य सरकारकडून अपेक्षा होती संविधानाप्रमाणे देश चालतो. असे वाटत होते मात्र असे दिसत नाही. कोर्टाकडून अपेक्षा होती तिथेही न्याय मिळाला नाही. म्हणून आज लोकशाही मार्गाने व शांततेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संविधानाची प्रत देण्यासाठी चाललो आहे. त्यांना आम्हाला आठवण करून द्यायची आहे तुमचे कर्तव्य काय आहे. ६० हुन अधिक गुन्हे बाबा रामगिरी वर दाखल असताना कार्यवाही होत नाही. म्हणून आज आम्ही मुंबईला निघालो आहे. मी जाती धर्माविरोधात बोलायला जात नाही तर राज्याची संस्कृती होती ते आपण विसरलो आहे. आम्ही गंगापूर मार्गाने जाणार होतो मात्र यातही घाणेरडे राजकारण सुरू आहे. गंगापूर येथे एक हिंदूत्ववादी रॅली काढली जात आहे त्यात काही लोक राजकारण करत असल्याने वाद नको म्हणून आम्ही मार्ग बदलला. पोलिस म्हणत आहेत इथं जाऊ शकत नाही तिथं जाऊ शकत नाही. आम्ही संविधान मानणारे आहोत. आम्हाला जायचे आहे आम्हाला अधिकार आहे. येणारे लोक कुठल्या पक्षाचे नाही. लोक मस्जिद मध्ये येऊन मारु म्हणतात आणि पोलिस गप्प बसतात त्यावर कारवाई होत नसेल तर मी कुठलाही झेंडा न वापरता जात आहे. मी सगळ्या पक्षांच्या लोकांना पत्र पाठवून आवाहन केले आहे. राजकीय दबाव असल्याने गुन्हे दाखल होत नाही. महापुरुषांचा, दैवी शक्तिचा अपमान होऊ नये यासाठी कायदा करण्याची गरज आहे. नितेश राणे जे बोलतात मग त्यांना मुभा आहे मला न्याय वेगळा आणि नितेश राणे यांना वेगळा न्याय अशी टीका त्यांनी केली.