चंद्रकांत खैरे यांना अंधश्रद्धेचे वेड म्हणून ते वेडेवाकडे बोलतात ; आमदार संजय शिरसाटांची टीका

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.१६
छत्रपती संभाजीनगर | लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली असून विविध पक्षांकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. शिवसेनेच्या उबाठा गटाकडून चंद्रकांत खैरे हेच उमेदवार असल्याचे भाकीत करून खैरे यांना अंधश्रद्धेचे वेड आहे म्हणून ते वेडेवाकडे बोलतात अशी घणाघाती टीका शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट यांनी शुक्रवारी (दि.१५) आयोजित पत्रकार परिषदेत केली.
उमेदवारीची घोषणा होण्या अगोदरच शिवसेनेच्या उबाठा गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी संपर्क कार्यालयाचे स्तंभ पूजन करून आपणच उमेदवार असल्याचे दाखवून दिले. यावर आमदार संजय शिरसाट म्हणाले कि, चंद्रकांत खैरे हेच शिवसेना उबाठा गटाचे लोकसभा उमेदवार असतील हे मी बॉंड वर लिहून देतो. दोन दिवसात राज्यात राजकीय भूकंप, होणार असल्याचाही दावा आमदार संजय शिरसाट यांनी यावेळी बोलतांना केला. येत्या दोन दिवसांत आमच्या शिंदे गटाकडे येणाऱ्यांची संख्या पाहिली तर अनेकांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. येत्या सोमवारी मोठे भूकंप पाहायला मिळणार असल्याचे भाकितही त्यांनी यावेळी केले. एमआयएम महाराष्ट्रात लोकसभेच्या सहा जागा लढवण्याची शक्यता आहे. याबाबत छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी तसे संकेतदेखील दिले आहेत. याबरोबरच खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांचा प्रचार देखील सुरू केला असून २०२४ ची लोकसभा निवडणूक जिंकणार असा दावा ते करत आहेत. यावर शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले, प्रत्येक उमेदवार आपल्या शैलीत प्रचार करत असतो. पण यावेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम नावालादेखील उरणार नाही, एवढे निश्चित आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीची युती होणार असल्याची चर्चा सरू आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठकादेखील पार पडत आहेत. तर महाविकास आघाडीने वंचितसाठी चार जागा देण्याचे मान्य केले. याबाबत शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मोठे विधान केले. ते म्हणाले, महाविकास आघाडीची बैठक होत आहे. मात्र, या बैठकीला अॅड. प्रकाश आंबेडकर यांना बोलावले नाही, म्हणजे महाविकास आघाडीला वंचित बहुजन आघाडीसोबत युती करायची नाही, हे स्पष्ट होत आहे. या आघाडीची सुरूवातच बिघाडीची आहे, असे संजय शिरसाट म्हणाले.
महायुतीच्या जागा वाटप दोन दिवसात पूर्ण होतील
लोकसभेसाठी महायुतीच्या जागा वाटप दोन दिवसात पूर्ण होतील शिवसेनेकडून चार जन इच्छुक असून मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनीही पक्षाकडून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच निर्णय घेऊन उमेदवार घोषित करणार आहेत. एकनाथ शिंदे हे लोकसभेसाठी जे उमेदवार घोषित करतील त्यांचेच काम आम्ही ताकदीने करू.
– आमदार संजय शिरसाट, प्रवक्ते, शिवसेना (शिंदे गट)