अखेर जरांगेनी १७ दिवसांनी उपोषण सोडले ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांना यश ;मराठा समाजाला मिळवूनच देणार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.१४
अंतरवाली सराटी | मराठा आरक्षणासाठी गेल्या १७ दिवसापासून जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात असलेल्या अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले होते. राज्य सरकारला धारेवर धरत मराठा समाजाच्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी या उपोषनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गुरुवारी (दि.१४) अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडले. मी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ठाम राहील, समाजाशी गद्दारी करणार नाही असे जरांगे यांनी यावेळी बोलतांना सांगितले. तर रद्द झालेले आरक्षण मराठा समाजाला मिळवूनच देणार असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांना दिले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जिद्दीने, चिकाटीने व प्रामाणिकपणे उपोषण केले. यासाठी सर्व मराठा समाजानेही त्यांना पाठींबा दिला. यापूर्वीही मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते मात्र ते न्यायालयात टिकले नाही अशी खंत व्यक्त करत मुख्यमंत्री म्हणाले कि जे आरक्षण रद्द झाले ते पुन्हा मिळविण्यासाठी हि जबाबदारी हि सरकारची आहे, आणि या राज्याचा प्रमुख म्हणून माझीही आहे. ३७०० मुलांना आमच्या या सरकारने नौकऱ्या दिल्या. न्या.शिंदे कमिटी मराठा आरक्षणावर सध्या काम करत असून लाठीचार्ज ची भूमिका अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले कि, गावकऱ्यानी केलेले आंदोलन हे शिस्तप्रिय होते. दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन आम्ही केले आहे. त्यामुळे या आंदोलनात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ते मागे घेण्याचा तातडीने काम सुरुकेले आहे. कुणावरही अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही कटिबद्ध असून जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मीही स्वस्थ बसणार नाही असेही शिंदे यांनी बोलतांना ठामपणे सांगितले. टिकणारे आरक्षण मिळाले पाहिजे हि ठाम भूमिका सरकारची आहे. मीही शेतकऱ्यांचाच गरीब कुटुंबातील माणूस आहे म्हणून मला तुमच्या सर्वांची भावना कळते. म्हणून मुख्यमंत्री पदाचा सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून मी इथे आलोय. हा एकनाथ शिंदे तुमचा आहे आणि तुम्हाला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हा विश्वास यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. माध्यमांनी जे सत्य आहे ते दाखवावे, उगाच गैरसमज होणारे बातमीपत्र करू नये असे आवाहनही यावेळी शिंदे यांनी केले. उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे यांनी वैद्यकीय उपचार घ्यावेत असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी मनोज जरांगे यांना सांगितले. उपोषण सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, संदीपान भुमरे, राजेश टोपे, अर्जुन खोतकर, नारायण कुचे यांची उपस्थिती होती.