महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापकांना मारहाणप्रकरणी हल्लेखोरांवर कारवाईसाठी तहसीलदारांना निवेदन

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.६

बीड | महाराष्ट्र ग्रामीण बँक धर्मापुरी, ता. परळी शाखेच्या शाखा व्यवस्थापक यांच्यासोबत झालेल्या मारहाणीबाबत तहसीलदार परळी यांना निवेदन देण्यात आले असून सदर गुन्ह्यातील आरोपींवर कडक कारवाई करुन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी कर्मचारी अधिकारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.महाराष्ट्र ग्रामीण बँक धर्मापुरी, ता. परळी शाखेचे शाखा व्यवस्थापक राहुल भालेकर हे दिनांक. ०१ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारच्या सुमारास शासकीय योजनेंतर्गत प्राप्त कर्ज प्रकरणाच्या मंजूरी पूर्व पाहणीसाठी गेले असतांना त्याठिकाणी कर्जाचे अर्जदार व त्यासोबत उपस्थित गुंड प्रवृत्तीच्या २ साथीदारांनी शाखा व्यवस्थापक यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर हल्ला चढविला तसेच हातापायाने, पाईपने व सीमेंट कुंडी वापरुन मारहाण करत जबर दुखापत केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या घटनेचा आम्ही बँकेतील सर्व कर्मचारी संघटना एकमताने जाहीर निषेध व्यक्त करतो. सदर प्रकरणात दि. ०१ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री उशिरा संबंधित हल्लेखोरांवर परळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी अद्याप पर्यन्त एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. विशेष बाब म्हणजे सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी याने याआधी देखील आधीच्या शाखा व्यवस्थापक यांना मारहाण केली होती. त्यावेळेस देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच आरोपीने पुन्हा एकदा तोच गुन्हा करणे यावरून परळी तालुक्यातील न्याय व्यवस्थेची खालावलेली परिस्तिथी निदर्शनास येते. दिवसेंदिवस अश्या प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झालेली असून बँक कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. बँक कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी पोलिस संरक्षण मिळाल्याशिवाय शाखेत काम करायला कोणीही अधिकारी किंवा कर्मचारी तयार होणार नाही. सदर गुन्ह्यातील आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी तसेच बँक कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी सुरक्षित वातावरण निर्मिती करून देण्यात यावी अन्यथा सर्व संघटना मार्फत मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारण्यात येईल व सदर आंदोलनाची जबाबदारी ही सर्वस्वी प्रशासनाची राहील असे तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात महाराष्ट्र ग्रामीण बँक कर्मचारी- अधिकारी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!