बीआरएसच्या कदिर मौलानांना औरंगजेबाचा पुळका ; म्हणे औरंगजेब आदर्श ; पत्रकार परिषदेत अजब फुत्कार

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.३
छत्रपती संभाजी नगर | अखंड हिंदुस्थानचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात असलेल्या छत्रपती संभाजी नगर मध्ये पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी तर आत्ताचे भारत राष्ट्र समितीचे कार्यकर्ते कदिर मौलाना यांना औरंगजेबाचा अचानक पुळका आला असून औरंगजेब हा आमच्यासाठी आदर्श असल्याचा अजब फुत्कार त्यांनी भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) आयोजित पत्रकार परिषदेत सोमवारी (दि.३) काढला आहे. चक्क गुरुपौर्णिमेच्या दिवशी या मौलानांना आपल्या “औरंगजेब” गुरुजींचा आदर्श वाटू लागल्याचे आश्चर्य राजकीय वर्तुळात वाटू लागले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये आपली पोळी भाजता न आल्याने कदिर मौलाना एप्रिल महिन्यात तेलंगाना राज्यात मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीच्या तंबूत दाखल झाले. छत्रपती संभाजी नगर मध्ये के. चंद्रशेखर राव यांच्या सभेनंतर एकदाही एकही शेतकरी, किंवा जन सामन्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर न उतरलेल्या भारत राष्ट्र समितीत कदिर मौलानांनी आज आपले ज्ञान पाजळून कहरच केला आहे. पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की, औरंगजेब हा दयाळू आणि दान धर्म करणारा आणि अखंड भारतावर ५३ वर्ष राज्य करणारा एकमेव राजा होता. त्याने विविध मंदिरांसाठी जागा दिल्या. औरंगजेब याने निपट निरंजन येथील जागा दिली, औरंगपुऱ्यातील नाथ मंदिरासाठी जागा दिली, किराड पुऱ्यातील राम मंदिराची जागा दिली, सत्तेची लढाई त्यावेळी वेगळी होती आणि आताही आहे. एवढी संपत्ती असतानाही त्याच्याकडे फक्त एका कफन खरेदी करण्या इतकीच आर्थिक जमा पुंजी होती. असा राजा मी कधीच नाही पाहिला असा उपदेशात्मक दिव्य दृष्टांत यावेळी मौलाना यांनी देऊन अधुरे ज्ञान असलेल्यांनी इतिहासाचा शोध घ्यावा अशी पुष्टीही यावेळी बोलतांना जोडली.
या केलेल्या वक्तव्याची चर्चा सर्व राजकीय वर्तुळात होत असून भारत राष्ट्र समितीच्या कदीर मौलाना यांना हा साक्षात्कार कसा झाला याचे कुतूहल निर्माण झाले आहे. यावर भारत राष्ट्र समितीचे जिल्हा समन्वयक आण्णासाहेब माने यांनी कदिर मौलाना यांचे हे वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक असून भारत राष्ट्र समितीशी या वक्तव्याचा काहीच संबंध नसल्याचे स्पष्ट करत आपले अंग काढून घेतले आहे. यावर मौलाना यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या तेलंगना दरबारात काय समाचार घेतला जातो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.