आंबेडकर जयंती महासमितीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे डॉ. कराडांच्या हस्ते उद्घाटन ; संपूर्ण देशाला प्रेरित करेल असे स्मारक छत्रपती संभाजी नगर मध्ये उभारण्याचे आश्वासन

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. १०
छञपती संभाजीनगर | निराला बाजार, ओल्ड केएफसी बिल्डिंग, मोतीवाला कॉम्प्लेक्स येथे असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव महासामितीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते रविवारी (दि.९) मोठ्या थाटात करण्यात आले. संपूर्ण देशाला प्रेरित करेल असे स्मारक छत्रपती संभाजी नगर मध्ये उभारण्याचे आश्वासन यावेळी मंत्री डॉ.कराड यांनी दिले.
महासामितीच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताचे अर्थशास्त्र मजबूत करण्याचे महान काम केले आहे. त्यांच्या मुळे भारतीय रिझर्व्ह बँक आज देशात काम करत आहे. बाबासाहेबांनी केवळ घटनाच लिहिली नाही तर या देशाची लोकशाही सक्षम केली आहे. संपूर्ण मानवतेला एकात्मतेचा संदेश दिला आहे. बाबासाहेबांमुळे जी संधी मला मिळाली त्या संधी मुळेच मी देशाच्या सर्वोच्च सभागृहात नेतृत्व करत असल्याने मी स्वतः ला भाग्यवान समजतो असे डॉ. कराड म्हणाले. संपूर्ण देशाला प्रेरित करेल असे स्मारक आपण या छत्रपती संभाजी नगर मध्ये उभारू, यासाठी महासमितीने पाठपुरावा करावा. शहरात शांतता राहावी यासाठी समितीच्या पदाधिकऱ्यांनीही पुढाकार घ्यावा असे आवाहन डॉ. भागवत कराड यांनी केले. भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वागतासाठी ५ कोटी रुपये मंजूर झाले असून यासाठी हे स्मारक कसे असावे यासाठी लवकरच बैठक घेणार असल्याचे ते म्हणाले. तर सहकार मंत्री अतुल सावे म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वत्र शांततेत झाली पाहिजे असा प्रयत्न महासमितीने करावा. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे युगपुरुष आहेत, घटनेच्या नियमानुसार आपण चालले पाहिजे, जर लंडन येथे बाबासाहेबांचे स्मारक होत असेल तर इथे का होत नाही याचा विचार आपण सर्वांनी करायला पाहिजे अशी खंत व्यक्त करत माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी विरोधकांना चिमटा काढला.
याप्रसंगी खा.इम्तियाज जलील आमदार सतीश चव्हाण, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, पृथ्वीराज पवार, माजी महापौर नंदकुमार घोडेले, डौलत खरात, रामभाऊ पेरकर, प्रकाश निकाळजे, जालिंदर शेंडगे, विजय मगरे, उत्सव समितीचे अध्यक्ष राजू शिंदे व कार्याध्यक्ष मिलिंद दाभाडे, कोषाध्यक्ष राजू आमराव समन्वयक गौतम खरात, गौतम लांडगे, किशोर थोरात यांची उपस्थिती होती.