मुकुंदवाडीत आज पासून तुळजाभवानी माता यात्रा उत्सव ; पारंपरिक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन ; विविध दुकाने खाद्य पदार्थ पूजा साहित्याची दुकाने सजली

मुकुंदवाडी भवानी माता यात्रा मैदानाची उत्सव समितीकडून पाहणी

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. २२  

छत्रपती संभाजीनगर | गेल्या अडीचशे वर्षांपासून मुकुंदवाडी येथील श्रीक्षेत्र लक्ष्मीदेवी व बालाजी मंदिर संस्थानच्या वतीने आयोजित तुळजाभवानी माता यात्रेस आज  मंगळवारपासून ( दि. २२)  प्रारंभ होणार असून, ही यात्रा २४ एप्रिलपर्यंत चालणार आहे. या दरम्यान भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात पारंपरिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे. मंदिर संस्थान व्यवस्थापकीय विश्वस्त मंडळाच्या वतीने यात्रा महोत्सवासंदर्भात माहिती देण्यासाठी रविवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी आमदार नारायण कुचे, माजी नगरसेवक मोतीलाल जगताप, बाबासाहेब डांगे, भाऊसाहेब जगताप, रामचंद्र नरोटे, बन्सिलाल कुचे यांनी यात्रा महोत्सव कालावधीतील धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची माहिती दिली.

नवसाच्या १२ गाड्या ओढणे….

तुळजाभवानी माता यात्रेस मंगळवार २२ एप्रिल रोजी सकाळी ५ वाजता देवीच्या महाअभिषेकाने प्रारंभ होणार असून, दुपारी २.३० वाजता भन्दे, व खेट्यांचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ५ वाजता नवसाच्या १२ गाड्या ओढल्या जाणार आहेत. रात्री ९ वाजता देवीचा गोंधळ आणि भंडार्‍याचा कार्यक्रम आहे. रात्री ९ वाजता देवीचा रथ मिरवणूक, सोंग आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर रात्री १० वाजता पारंपरिक छंदबाजी तमाशा हे कार्यक्रम होतील.  मिरवणूक भवानी माता मंदिर ते मारुती मंदिर या दरम्यान काढण्यात येणार आहे.

जाहीर कीर्तन व लावण्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम…

बुधवार, दिनांक २३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता महाप्रसादाचे आयोजन भवानी माता मंदिर येथे आयोजित करण्यात आले असुन रात्री ७ वाजता पावनधाम डोंगरगावकर हभप प्रभाकर महाराज शास्त्री यांचे जाहीर कीर्तन होईल तर रात्री १० वाजता यात्रा मैदानावर पुण्याच्या युवा नर्तिका लावण्यवती ख़ुशी शिंदे व टीम विविध सांस्कृतिक, व बहारदार नृत्य सादर करतील.

कुस्त्यांची भव्य दंगल….

भवानी माता देवीची यात्रा ही वंशपरंपरागत आयोजित केली जाते. या यात्रेत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. येथे होणारे कार्यक्रम हे अंधश्रध्देला नव्हे, श्रध्देला महत्त्व देणारे आहेत, असे यावेळी सांगण्यात आले. यात्रेच्या तिसर्‍या दिवशी २४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेपासून कुस्त्यांची भव्य दंगल आयोजित करण्यात आली आहे. या दंगलीतील यशस्वितांना रुपये १० पासून रुपये ११ लाखांपर्यंत बक्षिस दिले जाणार आहेत. यंदाच्या कुस्त्यांच्या दंगली प्रसंगी काका तालीम पुणे येथील अंतरराष्ट्रीय पैलवान धर्माजी कोळी, कोल्हापूर चे महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान उमाजी चव्हाण यांची उपस्थिती राहणार आहे. भाविक-भक्तांनी यात्रा महोत्सवात आयोजित कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुकुंदवाडी गाव यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

मुकुंदवाडी भवानी माता यात्रा मैदानाची उत्सव समितीकडून पाहणी….

गेल्या अडीचशे वर्षांपासून मुकुंदवाडी येथील श्रीक्षेत्र लक्ष्मीदेवी व बालाजी मंदिर संस्थानच्या वतीने आयोजित तुळजाभवानी माता यात्रेस आज मंगळवारपासून ( दि. २२) मोठ्या उत्साहात प्रारंभ होणार असून मुकुंदवाड भवानी माता यात्रा उत्सव समितीच्या वतीने यात्रेच्या पूर्वसंध्येला यात्रा मैदानाची पाहणी करण्यात आली.

यावेळी पाणी, आरोग्य यंत्रणा, वीज व्यवस्था,  कुस्ती मैदान, विविध खेळणी, विविध वस्तूंची दुकाने, उपहार गृह, पूजा साहित्य विक्रीची दुकाने यासह अग्निशमन यंत्रणा व्यवस्थेची पाहणी करून उत्सव समितीच्या वतीने देशभरातून आलेल्या विक्रेते, दुकानदार तसेच व्यापाऱ्यांना आवश्यक सूचना करण्यात आल्या. मुकुंदवाडी भवानी माता यात्रेमध्ये देशभरातून विविध राज्यातील नागरिक आपले नवस फेडायला येतात. त्यामुळे भाविकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी ग्रामस्थ तसेच यात्रा उत्सव समितीच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. भवानी यात्रेची संपूर्ण तयारी झाली असून मुकुंदवाडी भवानी यात्रा उत्सव समिती भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. या यात्रेमध्ये लक्षवेधक रहाट पाळणे, विविध खेळणी हे भाविकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहेत. विविध खाद्य पदार्थ, पूजेचे साहित्य यासह मुकुंदवाडी गावातील तरुण सेवक आपली सेवा देण्यासाठी सज्ज झाली आहेत. यात्रा मार्गात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी वाहतूक व्यवस्था करण्यात आली असून भव्य पार्किंग ची व्यवस्था येणाऱ्या भाविकांसाठी करण्यात आली आहे. या यात्रेमध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मुकुंदवाडी भवानी माता यात्रा उत्सव समिती २०२५ तसेच समस्थ ग्रामस्थांच्या च्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!