संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट
कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.१७
बीड | जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्यात येणार आहे. सीआयडी अधिकाऱ्यांनी केलेल्या अर्जानंतर बीड कोर्टाने संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले. कृष्णा आंधळेच्या नावावर ५ वाहने आणि धारुर तसेच केजमध्ये बँक खाती असल्याची माहिती आहे. दरम्यान, संतोष देशमुख हत्याप्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून आतापर्यंत तब्बल ६५ दिवसांपासून कृष्णा आंधळे फरार आहे.
फरार कृष्णा आंधळेची संपत्ती होणार जप्त…
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. या प्रकरणात सात आरोपींवन मोक्का लावण्यात आला आहे. वाल्मिक कराडवरही मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात वाल्मिक कराडवर आरोप केले जात आहेत. दुसरीकडे कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. आता याच कृ्ष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बीड न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.
सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय निघृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाला आता दोन महिने उलटून गेले आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस, एसआयटी आणि सीआयडी करत आहेत. तपास वेगाने सुरू असून काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. त्याचा ठिकठिकाणी शोध घेतला जात आहे मात्र तो काही केल्या सापडत नाही. म्हणून पोलिसांनी कृष्णा आंधळेला फरार घोषित केले आहे. यानंतर आता कृष्णा आंधळेची कोंडी करण्याची तयारी सुरू झाली आहे. सीआयडी अधिकाऱ्यांनी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. आंधळेच्या नावावर पाच वाहने आहेत. धारुर आणि केज येथील बँकेत त्याचे खाते आहे. ही सर्व संपत्ती जप्त करण्यात येणार आहे.
कृष्णा आंधळेचा घातपात : करुणा मुंडे
संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. ५० दिवसांहून अधिक काळ लोटला तरी कृष्णा आंधळेला पकडण्यात पोलीस, एसआयटी (SIT) आणि सीआयडी अपयशी ठरली आहे. यावर आता करुणा शर्मा-मुंडे यांनी भाष्य केलं. कृष्णा आंधळेचा खून झाला असावा असा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेचा दोन महिने झाले तरी तपास लागत नाही. त्याची हत्या देखील झाली असावी. वाल्मिक कराडला शरण यायला जर इतके दिवस लागत असतील तर कृष्णा आंधळे याला देखील मारून टाकलं असेल, असा दावा करूणा मुंडेंनी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता.