माजी आमदार सुभाष झांबड यांच्या जप्त केलेल्या मालमत्तांचे लिलाव होणार
अजिंठा अर्बन बँक घोटाळ्याप्रकरणी प्रस्ताव शासनाकडे

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.९ :
छत्रपती संभाजी नगर | अजिंठा अर्बन बँक गैरव्यवहारप्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड यांना पोलिसांनी अटक केली. आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधींच्या ठेवी जमा केल्या. त्या रकमा विनातारण कर्ज वाटप करून कोट्यवधींचा घोटाळा केला. याप्रकरणी पोलिसांनी अजिंठा अर्बन बँकेच्या संचालक मंडळांची मालमत्ता जप्त केली आहे. तिचे मूल्यांकन करणे सुरू आहे.
लवकरच या मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी शासनदरबारी प्रस्ताव पाठवणार असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने कळवले आहे. अजिंठा बँकेत ९७.४१ कोटींचा घोटाळा करून शहरातच छुप्या पद्धतीने फिरणारा सुभाष झांबड अखेर ४७४ दिवसांनंतर शुक्रवारी पोलिसांसमोर शरण आला. त्याची १२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. शनिवारी त्याचा जबाब घेण्याचे काम सुरू होते. झांबड यांनी त्यांच्या वेगवेगळ्या फर्ममध्ये काम करणाऱ्या ६ कर्मचाऱ्यांवर कोट्यवधींचे कर्ज काढले होते. ते भरण्यासाठी हे कर्ज बेबाक दाखवले.
काय आहे प्रकरण….
अजिंठा अर्बन बँकेत २००६ ते २०२३ या कालावधीत तब्बल ९७ कोटी ४१ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी बँकेचे तत्कालीन सीईओ प्रदीप कुलकर्णी आणि बँकेचे अध्यक्ष असलेल्या माजी आमदार सुभाष झांबड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेच्या भीतीने झांबड फरार झाले होते. ते शहरातील विविध कार्यक्रमांमध्ये दिसत असतानाही आर्थिक गुन्हे शाखेला त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. मात्र, अखेर पोलिसांनी त्यांना अटक केली. गुन्ह्याच्या तपासादरम्यान, सुभाष झांबड यांनी ६० कोटी रुपये परतफेड केल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेने दिली आहे. तरीही उर्वरित रक्कम आणि गैरव्यवहारातील अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अजिंठा बँक घोटाळ्यामुळे आर्थिक जगतात खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.