अभिनेते विकी कौशलने घृष्णेश्वराचे दर्शन करून क्रांती चौकात केले शिवरायांच्या अश्वारूढ स्मारकास अभिवादन
१४ फेब्रुवारी रोजी “छावा” होणार जगभरात प्रदर्शित ; प्रेक्षकांशी साधला संवाद

सचिन लिला सुखदेव अंभोरे | लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजी नगर | दि.६ : अष्टपैलू अभिनेता विकी कौशल आपला आगामी चित्रपट “छावा” च्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरातील प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आज सकाळीच वेरूळ येथील जोतिर्लिंग श्री घृष्णेश्वराचे दर्शन घेऊन अभिषेक केला. त्यानंतर क्रांती चौकातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून आपल्या चाहत्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज कि जय च्या घोषणांनी संपूर्ण क्रांती चौक परिसर दुमदुमला. यावेळी हजारो चाहत्यांनी विकी कौशल फोटो, व्हिडीओ घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. छत्रपती संभाजी नगरातील विविध ढोल पथकांनी विकी कौशल चे मराठमोळ्या पद्धतीने जोरदार स्वागत केले.
मराठी भाषेत पत्रकारांशी संवाद साधताना विकी कौशल म्हणाले कि, छत्रपती संभाजी नगर मध्ये तुमच्या सर्वांचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे.ज्या शहरांचे नाव छत्रपती संभाजी नगर आहे याचा अभिमान आहे आणि हे नाव घेऊन मी संपूर्ण जगभरात फिरणार आणि सर्वाना सांगणार आहे कि, आपले छावा काय आहे ते. इथे मी आलो नसतो तर माझा दौरा पूर्ण झाला नसता. मराठा जेव्हा गर्जतो तेव्हा, तुफान नाही तर इतिहास बनतो आणि हा इतिहास दाखवण्यासाठी नवे गाणे “तुफान” रिलीज झाले आहे. ते सर्वांनी नक्की बघण्याचे आवाहन अभिनेते विकी कौशल यांनी केले. छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारताना आलेले विविध अनुभव यावेळी विकी कौशल यांनी माध्यमांना सांगितले. दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर हे मला या सिनेमाच्या पहिल्या दिवसापासूनच राजे म्हणायला लागले होते. त्याचबरोबर चित्रपटातील सर्व टीम मला राजे म्हणायचे म्हणून माझे कर्तव्य होते कि हे पात्र पूर्ण ताकदीने निभवायचे. मला त्यांनी अगोदरच सांगितले होते कि मला छावा मध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करणारा शेर पाहिजे. आणि हि भूमिका निभावण्यासाठी मी प्रचंड मेहनत घेतली, अभ्यास केला. आणि महाराजांची भूमिका निभावण्याचा प्रयत्न केला. पुढच्या पिढीसाठी जे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी घालून दिले ते सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी या चित्रपटाच्या सर्वच टीम ने मेहनतीने काम केले.
रोज शिवगर्जना करूनच आम्ही सिनेमा चित्रित केला….
माझ्या सर्व सिनेमातील टीम ने १०० दिवसांचे चित्रीकरण केले. या काळात आम्ही विविध ठिकाणी गेलो. आम्ही शिवगर्जना केल्याशिवाय सिनेमाचे चित्रीकरण सुरु करतच नव्हतो. या सिनेमासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना अवगत असलेल्या सर्व विद्या मी शिकण्याचा प्रयत्न केला. ज्या पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांचे व्यक्तिमत्व होते. ते दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न मी केला.
१४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे नव्हे तर “छावा दिवस”
१४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे म्हणून तरुणाई यापूर्वी साजरा करत होती मात्र आता व्हॅलेंटाईन डे नव्हे तर १४ फेब्रुवारी हा दिवस “छावा दिवस” म्हणून साजरा करणार. ज्या महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी बलिदान दिले ते बलिदान येणारी प्रत्येक पिढी स्मरण करत राहील असे छत्रपती संभाजी महाराज आपल्याला या जगाला सांगायचे आहे. आणि हे या चित्रपटाच्या निमित्ताने तुमचे आमचे सर्वांचे कर्त्यव्य आहे. असे आवाहन अभिनेते विकी कौशल यांनी केले.