डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास सहा वर्षानंतर ‘चॅम्पियनशिप’ ; ‘युवा महोत्सव’चा जल्लोषात समारोप ; हजारो कलावंतांची उपस्थिती

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.२८
छत्रपती संभाजीनगर | डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ’केंद्रीय युवा महोत्सव’चा समारोप हजारो कलावंताच्या उपस्थितीत शनिवारी (दि.२८) जल्लोषत करण्यात आला. ढोल, शिट्या, टाळयांच्या गजरात विजेत्या संघाना पारितोषिक वितरण करण्यात आले. डॉ .बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात २५ ते २८ डिसेंबर दरम्यान आयोजित युवा महोत्सवाचा समारोप शनिवारी झाला. पारितोषिक वितरण सोहळा नाट्यशास्त्र विभागा शेजारील सृजनरंग या मुख्य रंगमंचावर घेण्यात आला. मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, विद्यार्थी विकास संचालक डॉ.कैलास अंभुरे यांची उपस्थिती होती. तसेच कुलपती नामनिर्देशित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.गजानन सानप, प्राचार्य डॉ.गौतम पाटील यांची विशेष उपस्थिती होती.
महोत्सवाच्या आयोजन सर्व समिती सदस्य तसेच कलावंतानी मोलाचे योगदान दिले. कुलगुरुचे अत्यंत उत्तम नियोजन यामुळे महोत्सव यशस्वी ठरल्याचे कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर प्रास्ताविकात म्हणाले. युवा महोत्सवात शिस्त, नियम व पारदशर्कतेची अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी केली असे, सल्लागार समिती सदस्य डॉ.दिलीप महालिंगे यांनी मनोगतात सांगितले. तर विद्यार्थी प्रतिनिधी हर्षदा केकाण, संघप्रमुख डॉ.हंसराज जाधव यांनी मनोगनातून उत्तम नियोजनाबद्दल कौतुक केले. प्रारंभी विद्यापीठ दिनदर्शीकेचे प्रकाशन करण्यात आले. युवा महोत्सवात सहभागी सर्व युवा कलावंत हे विद्यापीठाचे ब्रँड अॅम्बसडर आहात, गुणवत्ता व सामाजिक बांधिलकीच्या या विद्यापीठात शिकून करिअर घडवा, असे आवाहन डॉ.गजानन सानप यांनी केले. प्रारंभी डॉ गणेश शिंदे यांनी सादर केलेली ध्वनिचित्राफित दाखविण्यात आली. प्रा.पराग हासे यांनी सूत्रसंचालन तर डॉ.कैलास अंभुरे यांनी आभार मानले. समारोप सोहळयासाठी सृजनरंग सभागृह गर्दीने खच्चून भरले होते.
शिकण थांबलं, तो संपला : समीर चौघुले
अभिनय हा एक प्रयोग असतो. तो कधी फसतो, कधी जमतो. ’अनप्रेडिक्टेबल’ असलेल्या प्रयोगातून आपण खूप काही शिकत असतो. तेव्हा आयुष्यभर शिकत राहा. शिक्षण थांबविला की तुम्ही संपून जाल. अधोगती होईल हे लक्षात ठेवा, असा सल्ला अभिनेते समीर चौघुले यांनी युवा कलावंतांना दिला.अभिनय हा कोकणातल्या नागमोडी रस्त्यासारखां असतो. तेव्हा ’ग्राऊंड रिअॅलिटी’ समजून कामाला लागा, असेही ते म्हणाले. कलेवर प्रेम करणारा जिंदादिल माणूस म्हणजेच कुलगुरु डॉ.विजय फुलारी आहेत, असेही समीर चौघुले म्हणाले.
कलेची माती नको, मातीतील कला दाखवा : श्याम राजपूत
जमत नसलेल्या कलेची माती करण्यापेक्षा आपल्या मातीतील कला दाखवा. तुम्ही नक्कीच प्रगती कराल, असे आवाहन अभिनेते श्याम राजपूत यांनी केले. विद्यापीठाचा माजी विद्यार्थी म्हणून मिळालेला सन्मान आणि अहिराणी भाषेने आपणास मोठे केले. नव्या पिढीला माध्यमाचं मोठ ’एक्सपोजर’ आहे, असेही ते म्हणाले.
’लोककला’ महोत्सवही घेणार : कुलगुरु डॉ.विजय फुलारी
मराठवाडयाच्या गुणी कलावंतासाठी एकांकिका महोत्सवासोबतच लोककलेचा स्वतंत्र महोत्सव घेण्यात येईल, अशी घोषणा यावेळी मा कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी केली. कलेला उत्तमरितीने दाद द्या, मात्र धांगडधिंगा चालणार नाही. पुढील वर्षी महोत्सवात बेशिस्त अजिबात खपवून घेणार नाही, असेही कुलगुरु म्हणाले.
सर्वांच्या प्रेमाने भरून पावलो : डॉ कैलास अंभुरे
युवक महोत्सवासाठी दोन हजार कलावंत व शेकडो रसिक यांचे बळ काम करतांना मिळत गेले. तर मा.कुलगुरु यांचे खंबीर पाठबळ व सर्व सहकारी यांची मनापासून लाभलेली साथ यामुळे युवा महोत्सव यशस्वीरित्या पार पडला. कलावंत, रसिक, परीक्षक, संयोजन समिती या सर्वांतील सहकारी यांनी तन मन धनाने काम केले. सर्वांच्या प्रेमाच्या वर्षावाने भरून पावलो. विद्यार्थी कल्याण संचालकाच्या कारकिर्दीतील पहिलाच युवक महोत्सव अत्यंत उत्तमरितीने घेता आला याचा मनस्वी आनंद आहे, अशी प्रतिक्रिया विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ.कैलास अंभुरे यांनी व्यक्त केली.
___
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास ’चॅम्पियनशिप’
तब्बल पारितोषिकासह २१ जिंकले विजेतेपद
धाराशिव उप परिसराने दाखवली चुणूक
छत्रपती संभाजीनगर | डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघाने तब्बल सहा वर्षानंतर विजेतेपदावर नाव कोरले. विविध गटातील ढालीसह २१ पारितोषिके जिंकून या संघाने विजेतेपदाचा दुष्काळ संपविला.
कलावंतांच्या टाळ्या, शिट्ट्या व ढोल तासांच्या गजरात विद्यार्थ्यांनी पारितोषिके पटकावली. या महोत्सवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघाने विजेतेपदासह एकुण २१ पारितोषिके जिंकली. ललित कला गटातील सातही कलाप्रकारात प्रथम क्रमांक पटकावून सांघिक विजेतेपद व प्रा.दिलीप बडे स्मृती चषक जिंकला. या संघास संचालक डॉ.कैलास अंभुरे, डॉ.शिरीष अंबेकर, डॉ.वैशाली बोधेले, डॉ.गजानन दांडगे, गौतम सोनवणे आदींचे मार्गदर्शन लाभले. तर धाराशिव उपपरिसरातील संघानेही ८ पातिरतोषिकांसह नाटयगटातील विजेतेपद व जगन्नाथराव नाडापुडे चषक जिंकला. या संघास लोककला विभागप्रमुख डॉ.गणेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. पारितोषिक वितरण सोहळयाचे सूत्रसंचालन डॉ.समाधान इंगळे व डॉ.किशोर शिरसाठ यांनी केले.
विभाग निहाय विजेते संघ पुढीलप्रमाणे –
ललित कला विभाग उत्कृष्ट संघ – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,
वाड्ःमय विभाग उत्कृष्ट संघ – बलभीम महाविद्यालय, बीड,
महाराष्ट्राच्या लोककला उत्कृष्ट संघ – देवगिरी महाविद्यालय,
जगन्नाथराव नाडापुडे नाटयगट चषक – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उपपरिसर धाराशिव,
डॉ.दिलीप बडे ललित कला चषक – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,
डॉ.संजय नवले लोककला चषक – देवगिरी महाविद्यालय,
उत्कृष्ट ग्रामीण संघ – शिवाजी महाविद्यालय, कन्नड,
उत्कृष्ट संघ – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ