गंगापूर रत्नपूर विधानसभा मतदार संघाचे डोहाळे लागलेले सतीश चव्हाण यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून हकालपट्टी

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.१८
छत्रपती संभाजी नगर | दि.१८ : गंगापूर-रत्नपूर विधानसभा मतदार संघाचे डोहाळे लागलेले आणि मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे विद्यमान आमदार असलेले सतीश चव्हाण यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे आणि पक्षशिस्त मोडल्याबद्दल यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.
१५ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती सरकारच्या विरोधात प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी घेतली होती. वास्तविक सर्व समाजघटकांना न्याय देण्याची भूमिका महायुती सरकारच्या कार्यकाळात घेतलेली आहे. असे असताना आमदार सतीश चव्हाण यांनी जाणीवपूर्वक शिस्तभंग केलेला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
सतीश चव्हाण यांची ही राजकीय खेळी असल्याची चर्चा…
राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सतीश चव्हाणांनी अजित पवार गटात घरोबा केला. गंगापूर विधानसभा मतदार संघात निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी रोजगार मेळावे, महिलांचे विविध उपक्रम तसेच विकास कामे करण्याचा सपाटा लावला. गंगापूर विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व गेल्या दोन टर्म पासून आमदार प्रशांत बंब यांच्याकडे आहे. महायुतीत असूनही सतीश चव्हाण यांनी युती धर्म डावलत राजकीय खेळी सुरु केल्याची चर्चा मतदार संघात जोर धरत आहे. गंगापूर विधानसभा भाजप कडे असल्याने सतीश चव्हाण यांच्या गळाला उमेदवारी लागल्याची चिन्हे दिसताच चव्हाणांनी जाणीवपूर्वक शिस्तभंग केलेला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सतीश चव्हाण हे शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा असून गंगापूर-रत्नपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास ते इच्छुक आहेत. तुतारी हातात घेऊन निवडणुकीत उभे राहण्यासाठी ते जोर लावत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शरद पवार त्यांना संधी देतील का हे आता आगामी काही दिवसात स्पष्ट होईल.