बागेश्वर धाम सरकार यांचे संभाजीनगरात आगमन ; आजपासून तीन दिवस श्रीराम कथा, हनुमान कथा आणि दिव्य दरबार ; दिव्य दरबारासाठी सर्वांनी सहभाग घ्यावा ; डॉ. कराड यांचे आवाहन

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.६
छत्रपती संभाजीनगर | सकल हिंदू जनजागरण समिती आणि निमंत्रक तथा स्वागताध्यक्ष डॉ. भागवत कराड यांच्या वतीने जगविख्यात प. पु. बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या ६, ७ आणि ८ नोव्हेंबर असा तीन दिवसीय श्रीराम कथा, हनुमान कथा आणि दिव्य दरबाराचे आयोजन संभाजीनगर येथे करण्यात आले आहे. अयोध्या नगरी मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रासह आजूबाजूच्या राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक येणार असून बागेश्वर धाम सरकार यांचे रविवारी (दि. ५) छत्रपती संभाजीनगर विमानतळावर सायंकाळी आगमन झाल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या कथेसाठी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. कराड यांनी केले आहे.यावेळी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आमदार प्रदीप जैस्वाल, भाजप जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, प्रदेश सचिव किरण पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल मकरिये, अनुसूचित जाती मोर्चा प्रभारी राजू शिंदे, मनसेचे शहराध्यक्ष सुमित खांबेकर, सतनामसिंग गुलाटी, माजी उपमहापौर संजय जोशी, नवीनसिंग ओबेरॉय सकल हिंदू जनजागरण समितीचे वीरेंद्र धोका, जगदीश बियाणी, महावीर पाटणी, राजू जहागीरदार, आर. के शर्मा, मनीषा भन्साळी, डॉ. उज्वला दहिफळे, विजया अवस्थी आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ. कराड म्हणाले कि, बागेश्वर धाम यांचे विमानतळावर आगमन झाल्यानंतर भव्य वाहन रॅलीद्वारे त्यांचे डॉ. कराड यांच्या निवासस्थानी मुक्कामासाठी रवाना होतील. छत्रपती संभाजीनगर हे ऐतिहासिक आणि मराठवाड्याची राजधानी आहे. धार्मिक ,सांस्कृतिक, औद्योगिक आणि पर्यटन नगरी असल्याने बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्या भव्य दिव्य दरबाराचे आणि कथेचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले आहे. ऐन दिवाळी सणाच्या निमित्त भाविकांना दिव्य दरबाराच्या निमित्त अनोखी पर्वणी मिळणार आहे. या तीन दिवसांमध्ये बागेश्वर बाबा धाम यांच्या अमृत वाणीतून श्रीराम आणि हनुमान कथा होणार असून मराठवाड्यात पहिल्यांदाच त्यांचा कार्यक्रम होत आहे. बागेश्वर धाम यांची अफाट लोकप्रियता ही अनोख्या पद्धतीने पर्चा काढण्याच्या पद्धतीमुळे जगभरात नव्हे तर विदेशात देखील लोकांपर्यंत पोहोचली आहे. या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगरच नव्हे तर महाराष्ट्र आणि अन्य राज्यातून देखील भक्त शहरात येणार आहेत. सुमारे पाच ते दहा लाख भक्त उपस्थित राहतील असे नियोजन सकल हिंदू जनजागरण समिती यांच्या कडून करण्यात येत आहे.
बागेश्वर धाम यांचे शहरात आगमन…
५ नोव्हेंबर रविवार रोजी बागेश्वर धाम यांचे संभाजीनगर येथे सायंकाळी विमानतळावर आगमन. भव्य शोभा यात्रा आणि वाहन रॅलीद्वारे डॉ. भागवत कराड यांच्या निवासस्थानी आगमन झाले. यादरम्यान ठिकठिकाणी रस्त्यावर रांगोळी, बागेश्वर धाम यांच्या शोभा यात्रेत फुलांचा वर्षाव करण्यात येणार आहे.
६ नोव्हेंबरला भव्य कलश यात्रा आणि बागेश्वर धाम कथा…
६ नोव्हेंबर, सोमवार रोजी क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अयोध्या नगरी मैदानाकडे भव्य कलश यात्रा निघणार आहे. या यात्रेत सुमारे ५० हजाराहून अधिक महिलांचा सहभाग असणार आहे. भगव्या रंगाच्या साड्या परिधान करून, डोक्यावर श्रीफळ, कलश घेऊन या महिला यात्रेत सहभागी होणार आहेत. श्रीराम आणि हनुमान यांच्या वेशभूषेत भक्तगण सहभागी होणार असून वानर सेना लक्षवेधी ठरणार आहे. तसेच मध्यप्रदेश आणि देशाच्या विविध भागातून येणारे संत महात्मे यांच्या उपस्थितीत भव्यदिव्य असा शंखनाथ करण्यात येणार आहे. ठिकठिकाणी भगवे ध्वज घेऊन भाविक भक्त प्रभू श्रीरामाचा जयघोष करतील. सभास्थळी कलश यात्रा पोहोचल्यानंतर बागेश्वर धाम सरकार यांच्या मधुर वाणीतून श्रीराम आणि हनुमान कथा दुपारी ३ ते रात्री ८ दरम्यान भाविकांना ऐकायला मिळणार आहे. महापालिकेच्या स्वच्छता कामगाराच्या हस्ते बागेश्वर धाम सरकार यांची आरती करण्यात येणार आहे.
७ नोव्हेंबरला दिव्य दरबार आणि कथा…
बागेश्वर धाम यांची अफाट लोकप्रियता ही अनोख्या पद्धतीने पर्चा काढण्याच्या पद्धतीमुळे जगभरात नव्हे तर विदेशात देखील लोकांपर्यंत पोहोचली आहेत. त्यामुळे सध्या ते सर्वाधिक लोकप्रिय बनले आहेत. बागेश्वर धाम यांचा दिव्य दरबार हा ७ नोव्हेंबर, मंगळवार रोजी दुपारी १२ ते २:३० दरम्यान अयोध्या नगरी मैदानावर भरणार आहे. तर दुपारी ३ ते रात्री ८ यावेळेत बागेश्वर धाम यांचा कथा सोहळा होणार आहे.
८ नोव्हेंबरला कथा सांगता सोहळा…
अयोध्या नगरी मैदानावर बागेश्वर धाम यांच्या अमृतवाणीतून श्रीराम आणि हनुमान कथा श्रवण करण्याची संधी भाविकांना मिळणार आहे. हि कथा दुपारी २ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत कथेचा सांगता सोहळा होणार आहे. त्यानंतर बागेश्वर धाम सरकार हे विमानतळाकडे रवाना होतील. तेथून ते खजुराहोकडे प्रयाण करतील.
दररोज दोन लाख भाविकांसाठी महाप्रसाद (लंगर)…
बागेश्वर धाम सरकार यांच्या कथेसाठी येणाऱ्या भाविकांच्या भोजनाची व्यवस्था शीख बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे. दररोज कथेनंतर दोन लाख भाविकांना महाप्रसादाचे (लंगर) आयोजन करण्यात आले आहे.
नियोजनासाठी विविध समित्या कार्यरत…
कथेसाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी विविध समित्या कार्यरत आहेत यामध्ये भोजन वाटप समिती, जल वाटप समिती, बैठक नियोजन समिती, पार्किंग समिती, स्वच्छता समिती, मंडप व्यवस्था समिती, आपतकालीन समिती, वाहतूक नियोजन समिती, कलश यात्रा (महिला) समिती, शासकीय परवाना समिती सोशल मीडिया प्रचार/प्रसार, निमंत्रण वाटप समिती (बूथ रचना) आदी समित्यांमध्ये हजारो सकल हिंदू जनजागरण समितीचे सदस्य कार्य करत आहेत.
आरोग्य यंत्रणा सज्ज…
कथेच्या ठिकाणी होणारी लाखोंची गर्दी पाहता आयोजकांच्या वतीने रुग्णवाहिकांनी सुसज्ज आरोग्य यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कथास्थळी २० खाटांचा दवाखाना उभारण्यात आला आहे. तसेच सुमारे ४०० डॉक्टर्स, १० कार्डियाक ऍम्ब्युलन्स तैनात असणार आहेत.
स्वयंसेवकांची फौज…
या संपूर्ण आयोजनासाठी शहरातील सकल हिंदू जनजागरण समितीचे सदस्य, महायुतीचे तसेच भाजपचे असे सुमारे २० हजार स्वयंसेवक कथेच्या आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत. भाजप पक्षाचे पदाधिकारी, युवा मोर्चा, महिला मोर्चा, ओबीसी मोर्चा, अनुसूचित जाती जमाती मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चा, कामगार मोर्चा, शिक्षक आघाडी, दिव्यांग आघाडी, पदवीधर प्रकोस्ट, भजनी मंडळ, वारकरी संप्रदाय यासाठी परिश्रम घेत आहेत.
पार्किंग व्यवस्था…
कर्णपुरा मैदान कर्णपुरा मैदानाच्या समोरील खुली जागा, छावणी परिसरातील बाजार मैदान, जिल्हा न्यायालय समोरील तापडिया मैदान, महानुभव आश्रम समोरील कृषी महाविद्यालय मैदान, देवगिरी महाविद्यालय मैदान, शासकीय तंत्रनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालय मैदान या ठिकाणी वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
सफाई कामगारांच्या हस्ते आरती…
दलित, वंचित, अनुसूचित जाती जमाती, मागास प्रवर्गातील आणि वाल्मिकी समाजाच्या घटकातील व्यक्तींच्या हस्ते बागेश्वर धाम बालाजी भगवान यांची आरती करण्यात येणार आहे.