बीआरएस ने लावला राजकीय सुरुंग ; जनतेसाठी नव्हे स्वतः च्या राजकीय पुनर्वसनासाठी माजी आमदार, खासदार, नगरसेवक गुलाबी तंबूत

सचिन एस.अंभोरे | लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर | दि. २३ : “सारा गाव मामाचा आणि एक नाही कामाचा” अशी अवस्था सध्या छत्रपती संभाजी नगरसह मराठवाड्यातीलतील राजकीय पुढाऱ्यांची आहे. पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत असल्याने जनतेसाठी नव्हे तर आपल्या स्वतः च्या राजकीय पुनर्वसनासाठी अनेक माजी आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य तसेच विविध पक्षातील पदाधिकाऱ्यानी महाराष्ट्रात नव्याने आपले पाय रोवू पाहणाऱ्या भारत राष्ट्र समितीच्या गुलाबी तंबूत जाहीर प्रवेश करण्याचा सपाटा लावल्याचे दिसून येत आहे. विविध पक्षातील पदाधिकाऱ्याना प्रलोभन आणि आश्वासने देऊन बीआरएसने राजकीय सुरुंग लावल्याने इतर मातब्बर पक्षांना चांगलीच धडकी भरली आहे. जाहीर प्रवेश केल्यानंतर आगामी काळात या राजकीय पुढाऱ्यांचे काय भवितव्य असेल हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.
“अब कि बार किसान सरकार” हे ब्रीद घेऊन भारत राष्ट्र समितीने तेलंगणा राज्यात राबविलेले विकासाचे मॉडेल महाराष्ट्रात राबविण्याचा निर्धार केला आहे. महाराष्ट्रात पक्ष सत्तेत आल्यास २४ तास वीज उपलब्ध करून देऊ़ असे आश्वासन देत विकासाचे मॉडेल आता महाराष्ट्रात राबविण्याचे पक्षाचे स्वप्न आहे. त्यादृष्टीने भविष्यात काम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे बीआरएस पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रभारी आ. जीवन रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. आमच्या पक्षात चाळीसहून आधी नगरसेवक तसेच आजी माजी आमदार खासदार प्रवेश करणार असलाचाही दावाही त्यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील बीड बायपास रोडवरील जबिंदा मैदानावर २४ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची जाहीर सभा व स्थानिक नेत्यांचा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सभेची जय्यत तयारी बीआरएसच्या वतीने करण्यात येत असल्याने पक्षातील बहुतांश पदाधिकारी गेल्या महिनाभरापासून शहरात तळ ठोकून आहेत.
सभेला गर्दी जमवण्यासाठी कसरत….
सोमवारी मुख्यमंत्री केसिआर यांच्या उपस्थितीत सभा होत असल्याने मराठवाड्यातून गर्दी जमविण्यासाठी मोठी कसरत पक्षात नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांना करावी लागत आहे. सभेसाठी साम, दाम, दंड, भेदाचे सर्व अस्र वापरून इतर सर्व “अर्थ” व्यवस्था केल्या जात असल्याची कुजबुज ऐकायला मिळत आहे. भर उन्हात कार्यकर्ते घरोघरी जाऊन सभेचा प्रचार करत असल्याचे चित्र शहरात निदर्शनास येत आहे. विविध वार्ड, दलित वस्त्या तसेच स्लम भागात कार्यकर्ते जाहीर सभेत सहभागी होण्याचे आवाहन करत आहे. सभेच्या प्रचारासाठी भारत राष्ट्र समितीने लक्षवेधक जाहिरातींचे रथ तयार केल्याने चौफेर ध्वनिक्षेपकातून बी आर एस च्या प्रचाराचा आवाज दुमदुमत आहे. आता सभेला किती गर्दी होईल हे सोमवारी जबिंदा मैदानावर स्पष्ट होईल.