शुक्रवारपासून तुळजाभवानी माता यात्रा ; मुकुंदवाडी येथे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. १३
*छत्रपती संभाजी नगर | मुकुंदवाडी येथील श्रीक्षेत्र लक्ष्मीदेवी व बालाजी मंदिर संस्थानच्या वतीने आयोजित तुळजाभवानी माता यात्रेस येत्या शुक्रवारपासून प्रारंभ होणार असून, ही यात्रा १६ एप्रिलपर्यंत चालणार आहे. या दरम्यान भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे.
मंदिर संस्थान व्यवस्थापकीय विश्वस्त मंडळाच्या वतीने यात्रा महोत्सवासंदर्भात माहिती देण्यासाठी बुधवारी (दि.१२) पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी आमदार नारायण कुचे, माजी नगरसेवक मोतीलाल जगताप, बाबासाहेब डांगे, गटनेते भाऊसाहेब जगताप यांनी यात्रा महोत्सव कालावधीतील धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची माहिती दिली.
नवसाच्या १२ गाड्या ओढणे
तुळजाभवानी माता यात्रेस १४ एप्रिल रोजी सकाळी ५ वाजता देवीच्या महाअभिषेकाने प्रारंभ होणार असून, दुपारी २.३० वाजता भन्दे व खेट्यांचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ५ वाजता नवसाच्या १२ गाड्या ओढल्या जाणार आहेत. सायंकाळी ७ वाजता देवीचा गोंधळ आणि भंडार्याचा कार्यक्रम आहे. रात्री ९ वाजता देवीचा रथ मिरवणूक, सोंग आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मिरवणूक भवानी माता मंदिर ते मारुती मंदिर या दरम्यान काढण्यात येणार आहे. यात्रेच्या दुसर्या दिवशी शनिवारी रात्री ८ वाजता राष्ट्रीय कीर्तनकार सुनीता आंधळे यांचे कीर्तन होणार आहे.
कुस्त्यांची दंगल
भवानी माता देवीची यात्रा ही वंशपरंपरागत आयोजित केली जाते. या यात्रेत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. येथे होणारे कार्यक्रम हे अंधश्रध्देला नव्हे, श्रध्देला महत्त्व देणारे आहेत, असे यावेळी सांगण्यात आले. यात्रेच्या तिसर्या दिवशी १६ एप्रिल रोजी दुपारी ३ ते रात्री १० या कालावधीत कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे. या दंगलीतील यशस्वितांना रुपये १ पासून रुपये ५ लाखांपर्यंत बक्षिस दिले जाणार आहेत. यंदाच्या कुस्त्यांच्या दंगलीचे बक्षीस वितरण महाराष्ट्र केसरी-२०२३ विजेते पै. शिवराज राक्षे, नॅशनल चॅम्पियन पै. विक्की केहार यांच्या हस्ते होणार आहे. कुस्त्यांच्या दंगलीत पै. विलास डोईफोडे, उमेश चव्हाण आदी पैलवान सहभागी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. भाविक-भक्तांनी यात्रा महोत्सवात आयोजित कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले.
याप्रसंगी हिरालाल कुचे, सुखदेव शिंदे, काशिनाथ गुळे, तुकाराम राते, उत्तम खोतकर, साळुबा ठुबे, देविदास जगताप, गंगाधर गायकवाड, कमलाकर जगताप, सुनील जगताप, किशन ठुबे, रामचंद्र नरोटे, संजय जगताप, देविदास कुचे, दीपक खोतकर, परमेश्वर गायकवाड, संतोष शिंदे, मनोहर जगताप, सखाहरी जगताप, प्रशांत जगताप, बाबासाहेब शिंदे, किशोर ठुबे, ज्ञानेश्वर शिंदे, रतनलाल साळवे, नामदेव राते, बबन जगताप, जगदीश गायकवाड, संतोष जगताप, बंडू ठुबे, अरुण जगताप, विठ्ठल पोफळे, सतीश जगताप, जगदिश नांदरकर, गणेश खोतकर, बन्शी कुचे, भागचंद्र शिंदे, शिवाजी राते, दत्ता ठुबे आदींची उपस्थिती होती.