छत्रपती शिवाजी महाराज यांचा जुना पुतळा हर्सूल टी पॉईंट येथे बसविण्यात यावा ; माजी नगरसेवक अभिजित देशमुख यांची मनपा प्रशासनाकडे मागणी

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. २३      

छत्रपती संभाजीनगर | क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा २१ फुटी उंच पुतळा आता बसवण्यात आला असून या ठिकाणी जो छत्रपती शिवाजी महाराज यांचा जुना पुतळा होता तो हर्सूल टी पॉईंट येथे बसविण्यात यावा अशी मागणी औरंगाबाद-संभाजीनगर जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अभिजित देशमुख यांनी महानगर पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजित चौधरी यांच्याकडे केली आहे. यासंदर्भातील पत्र २८ जानेवारी २०२२ रोजी  देण्यात आले होते मात्र याकडे महानगर पालिका प्रशासनाने  पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट करत शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्याचे अभिजित देशमुख यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारचा महत्वकांक्षी असलेला नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे काम बहुतांशी झाले आहे. शहरातून हर्सूल जवळ असलेल्या सावंगी येथे इंटरचेंजकडे या मार्गावरून अजिंठा लेणीकडे पर्यटकांना जाता येणार असल्याने शहरात येणाऱ्या पर्यटक तसेच शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा क्रांती चौक येथील जुना पुतळा हर्सूल टी पॉईंट येथे बसविण्यात यावा ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा प्रत्येकाला मिळेल. ऐतिहासिक औरंगाबाद शहराला जोडणारा हा महत्वाचा मार्ग असून हर्सूल टी पॉईंट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी उंच चबुतरा व सभोवताली सुशोभिकरण करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा जुना पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने महापालिका प्रशासनाकडे केली आहे. मात्र या पत्राकडे दुर्लक्ष केल्याने समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. येत्या १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होणार आहे. शिवजयंतीचे औचित्य साधून महापालिका आयुक्त तथा प्रशासक म्हणून आपण गांभीर्याने दखल घेऊन तातडीने पुढील कार्यवाही करावी अशी अशी विनंती माजी नगरसेवक अभिजित देशमुख यांनी या पत्राद्वारे केली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!