भाजपच्या लोकसभेचा बिगुल आज वाजणार ; मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची जाहीर सभा

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. २
छत्रपती संभाजीनगर | गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांनंतर भाजपने मिशन २०२४ ची तयारी सुरू केली आहे. देशातील ज्या लोकसभा मतदार संघात भाजपाचे खासदार नाहीत, अशा १४४ जागांवर पक्ष अत्यंत प्रभावी आणि नियोजनबध्द योजना राबविण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्रात अशा १६ जागा आहेत, जिकडे विशेषत्त्वाने लक्ष घातले जात आहे. थेट जाहीर सभा घेत लोकसभा प्रचाराचा बिगुलच छत्रपती संभाजी नगरमधून वाजणार आहे. यासाठी भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीने आपली कंबर कसली असून आज (दि.२) सायंकाळी ५ वाजता शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर भारतीय जनता पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या सभेच्या संपूर्ण तयारीची धुरा केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ.भागवत कराड यांच्यावर असून सोबतीला सहकार मंत्री अतुल सावे यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
भाजपने वर्षभर आधीपासूनच लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रातील प्रचाराचा नारळ पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या जाहीर सभेने २ जानेवारी रोजी छत्रपती संभाजी नगर येथून फुटणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे २ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजता चंद्रपूर येथून औरंगाबादेत आगमन होईल. यावेळी राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर ,जिल्हा शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, अनिल मकरीये, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर,जिल्हाध्यक्ष विजय औताडे, माजी महापौर बापू घडामोडे आदी त्यांच्या दिमतीला असतील. नड्डा सर्वप्रथम वेरूळ येथील घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी जातील. तेथून सरळ सभासस्थानी ५.३० वाजता हजर होतील. मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील सभा संपल्यानंतर छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघाच्या कोअर कमिटीच्या बैठकीला हजेरी लावून नंतर मुंबईकडे रवाना होतील.
येणार्या लोकसभेच्याद्दष्टीने आणि लवकरच होणार्या जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जे. पी. नड्डा यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण आहे. राज्यातील ज्या १६ जागांवर सध्या भाजपाचे खासदार नाहीत, त्याठिकाणी विशेष लक्ष केंद्रीत करण्याच्या द्दष्टीने केंद्रीय नेतृत्वाचे दौरे आयोजित करण्यात येत आहेत. मराठवाड्यातीलआठही जागा पूर्ण ताकदीने लढवून जिंकण्याचा दावा डॉ.भागवत कराड यांनी सभा स्थळाच्या पाहणी दरम्यान केला आहे.