छत्रपती संभाजीनगरकरांनी अनुभवली स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींची धगधगती जाज्वल्य अंगारगाथा ; पहिल्या प्रयोगाचे रेकॉर्डब्रेक गर्दीत सादरीकरण

सचिन एस. अंभोरे | लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर | दि.  : भव्य दिव्य किल्याचा ऐतिहासिक रंगमंच… स्वराज्यासाठी केलेली धाडसी लढाई… चित्तथरारक घोडेस्वारी… छत्रपती शिवशंभूंचा जयघोष आणि डोळे दिपवणारा, फटाक्यांच्या आतिषबाजीतील राज्याभिषेक पाहून प्रत्येक शिवभक्त नतमस्तक झाले. जगदंब क्रिएशन च्या वतीने महेंद्र वसंतराव लिखित, दिग्दर्शित व डॉ.अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेल्या शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या पहिल्या प्रयोगाचे शुक्रवारी (दि.२३) रेकॉर्डब्रेक गर्दीत बीड बायपास येथील जबिंदा लॉन्स येथे सादरीकरण झाले. यावेळी छत्रपती संभाजीनगरकरांनी स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींची धगधगती जाज्वल्य अंगारगाथा अनुभवली.

महानाट्यायासाठी १२० फुटी भव्यदिव्य किल्याचा रंगमंच पाहणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधत होता. प्रत्येक शिवशंभूंभक्तांना या महानाट्याचे प्रत्येक क्षण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह आवरता आला नाही. प्रेक्षकातून करण्यात आलेली शंभूराज्यांची घोडेस्वारी रंगमचावरील प्रकाशयोजना, ध्वनी यंत्रणेतून प्रत्येकापर्यंत पोहचणारे ऐतिहासिक संवाद, ताकदीने कसलेला प्रत्येक कलावंतांचा अभिनय आणि रुबाबदार वेशभूषा ही महानाट्याची जमेची बाजू दिसून आली.

तब्बल दहा वर्षानंतर शहरात शिवपुत्र संभाजी हे  महानाट्य २३ डिसेंबर ते २८ डिसेंबर दरम्यान सादर होत असल्याने शहरातील शिवभक्त तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना प्रचंड उत्सुकता होती. डॉ. गिरीश ओक औरंगजेबाची भूमिका निभावत आहे तर महाराणी येसूबाईची भूमिका अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड साकारत आहेत, सोबतच महेश कोकाटे, विश्वजीत फडते, अजय तपकीरे, रमेश रोकडे इत्यादी सिनेकलावंतांचा सहभाग या महानाट्यात आहे. स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींचा इतिहास प्रत्यक्षात कळावा यासाठी या महानाट्याचे आयोजन करण्यात आल्याची भावना अभिनेते खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रयोग झाल्यानंतर विद्यार्थी पालकांशी संवाद साधतांना व्यक्त केली. प्रत्येकाने हे महानाट्य पाहून छत्रपती संभाजी महाराजांचे विचार आणि संस्कार घराघरात रुजवावे असे आवाहनही यावेळी केले. १५० पेक्षा जास्त कलाकारांचा सहभाग या महानाट्यात असल्याने सर्व रंगमंच तसेच मैदानाचा वापर करून शिवपुत्र संभाजी या महानाट्याने शिवशंभूंचा इतिहास ताकदीने अभिनयातून उभा केला.

सर्व छायाचित्रे : कृष्णा लोखंडे पाटील)

“हा शिवपुत्र संभाजी, या सह्याद्रीच्या पटलावर पुन्हा पुन्हा जन्म घेईल… इथल्या पाण्याच्या थेंबथेंबात अन् मातीच्या कणाकणांत मिसळलेला, सळसळत्या रक्ताचा हा अंगार आपल्या मनात धगधगता ठेवा” हा अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी महानाट्याच्या शेवटी केलेला संवाद महानाट्य पाहिल्यानंतर प्रत्येकाला शिवशंभू च्या कार्याचा विचार करून स्फुल्लिंग चेतवणारा आहे. ज्वलज्वलंत तेजस शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांचा हा इतिहास प्रत्येकाने पाहावा असाच आहे. “पुन्हा तोच झंझावात ’शिवपुत्र संभाजी’ महानाट्य दिनांक २३ डिसेंबर ते २८ डिसेंबर दरम्यान रोज एक प्रयोग २८ डिसेंबरपर्यत सायंकाळी ६ वाजता शिवशंभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक छत्रपती संभाजी नगरात सादर होत असून सहकुटुंब आवर्जून मराठी अस्मितेसाठी तिकीट खरेदी करूनच पाहावा व कलावंताना प्रोत्साहन द्यावे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!